
ShivSena Row: 2018ची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीनेच! अरविंद सावंतांनी थेट व्हिडिओच आणला समोर
मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोगावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली. आयोगानं आपल्या निर्णयात २०१८ ची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीनं झाली नसल्याचा एक मुद्दा उपस्थित केला होता. पण ही कार्यकारिणी लोकशाही पद्धतीनंच झाल्याचा दावा करत थेट याचा एक व्हिडिओ खासदार अरविंद सावंत यांनी समोर आणला आहे. (Shiv Sena 2018 executive happened in democratic manner Arvind Sawant release event video)
सावंत यांनी समोर आणलेल्या व्हिडिओत सभागृहात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याचं दिसतं आहे. तसेच यावेळी विविध पदांच्या घोषणाही करण्यात आल्याचं दिसत आहे. यामध्ये लीलाधर डाके, गजानन किर्तीकर, दिवाकर रावते, मनोहर जोशी आदी ज्येष्ठ मंडळी दिसत आहेत.
त्याचबरोबर या ज्येष्ठ नेत्यांकडून भाषणंही करण्यात आल्याचं या व्हिडिओत दिसंत आहे. यामध्ये अनेकांनी तर ठाकरे कुटुंबियांचं कौतुकही यामध्ये केलं आहे. तसेच यावेळी खासदार गजानन किर्तीकर यांनी मांडलेल्या ठरावाला सर्वांनी हात उंचावून मान्यता दिल्याचंही यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
सावंत यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
अरविंद सावंत यांनी हा व्हिडिओ सादर करताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले. "देशाचा सध्या अमृतकाल सुरु आहे की विषकाल हे आता ठरवावं लागेल. देशाच्या सर्वोच्च घटनेलाच निवडणूक आयोगानं घाव घातला आहे. मग कशाला घटनेत परिशिष्ट १० समाविष्ट केलं? असा सवालही त्यांनी केला. आम्ही आमच्या कार्यकारिणी निवडीचं पत्र ४ एप्रिल २०१८ला निवडणूक आयोगाकडं सादर केलं पण आयोगानं धादांत खोट सांगितलं की ते आम्ही दिलंच नाही"