शिवाजी पार्कवरील ग्रीलवरून शिवसेना-मनसे "आमने-सामने'; पैशांची लूट होत असल्याचा मनसेचा आरोप 

समीर सुर्वे
Saturday, 16 January 2021

जुने स्टेनलेस स्टीलचे ग्रील सुस्थितीत असताना लोखंडी ग्रील बसवले जात असून, ही पैशांची लूट आहे, असा आरोप मनसेने केला. 

मुंबई  : शिवाजी पार्कवरून शिवसेना-मनसे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. वीर सावरकर मार्गाच्या पदपथावरील जुने ग्रील काढून नवे ग्रील बसवले जात आहेत; मात्र जुने स्टेनलेस स्टीलचे ग्रील सुस्थितीत असताना लोखंडी ग्रील बसवले जात असून, ही पैशांची लूट आहे, असा आरोप मनसेने केला. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

शिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गाच्या पदपथावर पाच-सहा वर्षांपूर्वी मनसेचे तत्कालीन नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या विकास निधीतून स्टेनलेस स्टीलचे ग्रील्स बसविण्यात आले होते. आता हे जुने ग्रील काढून त्या ठिकाणी नवे ग्रील बसवले जाणार आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका, महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या विकासनिधीतून हे काम सुरू आहे. यावर देशपांडे यांनी आक्षेप घेतला. जुने स्टेनलेस स्टीलचे ग्रील आजही मजबूत आहेत. त्या ठिकाणी तकलादू लोखंडाचे ग्रील्स बसवले जाणार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. हा कंत्राटदाराचे पोट भरण्याचा प्रकार असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला. याबाबत विशाखा राऊत यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. शिवाजी पार्क आणि दादर परिसरातील विविध मुद्द्यांवरून शिवसेना आणि मनसे यापूर्वी एकमेकांना भिडली आहे. त्यात आता नव्या मुद्द्याची भर पडली आहे.  

 Shiv Sena MNS clashes from grill on Shivaji Park in mumbai

----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena MNS clashes from grill on Shivaji Park in mumbai