शिवसेनेची माघार घेण्याची तयारी; असा असेल नवीन फॉर्म्युला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सिंहाचा वाटा मागणाऱ्या शिवसेनेने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. राज्यातील 288 मतदारसंघांपैकी 145-125-18 जागांच्या फॉर्म्युलावर शिक्‍कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे. पितृपक्षानंतर दोन दिवस ठप्प असलेली चर्चा आज मध्यस्थांमार्फत पुन्हा सुरू झाल्यानंतर शिवसेनेकडून हा प्रस्ताव भाजपला पाठविण्यात आला असून, भाजपही यावर सहमत होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सिंहाचा वाटा मागणाऱ्या शिवसेनेने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. राज्यातील 288 मतदारसंघांपैकी 145-125-18 जागांच्या फॉर्म्युलावर शिक्‍कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे. पितृपक्षानंतर दोन दिवस ठप्प असलेली चर्चा आज मध्यस्थांमार्फत पुन्हा सुरू झाल्यानंतर शिवसेनेकडून हा प्रस्ताव भाजपला पाठविण्यात आला असून, भाजपही यावर सहमत होण्याची शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या चर्चेत विधानसभा निवडणुकीतही युती होणार आणि समान जागावाटप होणार असे सूत्र ठरल्याचे दोन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, भाजपने आता माघार घेत जागावाटप करताना शिवसेनेची अडवणूक करण्यास सुरवात केली होती. शिवसेनाही 135-135 च्या फॉर्म्युलावर अडून बसली होती. अखेरीस आज झालेल्या चर्चेनंतर भाजप 142 ते 145 जागा, शिवसेना 128 ते 125 जागांवर निवडणूक लढविण्यास तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मित्रपक्षांना मात्र 18 जागा देण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झालेले असून, त्या जागा मात्र कमी- जास्त झालेल्या नसल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीसाठी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपकडे अपेक्षेपेक्षा अधिक जणांची भरती झाल्याने भाजपवर इच्छुकांना उमेदवारी देण्याची जबाबदारी वाढली, त्यामुळेच पितृपक्षाच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये भाजपकडून कॉंग्रेसमधून आलेल्या अमुकसाठी ही जागा, तर राष्ट्रवादीमधून आलेल्यासाठी ती जागा अशी जागा मागण्यास सुरवात झाली होती. उमेदवारनिहाय जागांचे वाटप होऊ लागल्याने उद्धव ठाकरे त्रस्त झाल्याने जागावाटपाची चर्चा थांबली होती. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी प्रसिद्धी माध्यमांना मुख्यमंत्रीच शिवसेनेच्या उमदेवारांची यादी जाहीर करतील असा टोला मारला होता. उद्धव ठाकरेंनी उघडपणे नाराजी व्यक्‍त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही चर्चा पुढे जावी यासाठी प्रयत्न केल्याचे समजते.

... त्या जागाही द्या!
जागावाटपाच्या चर्चेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या 63 जागांव्यतिरिक्‍त ज्या जागांवर कॉंग्रेस- राष्ट्रवादी जिंकली आहे; पण शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे अशा जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. मात्र त्यावर अद्याप सहमती झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena ready to Alliance get new formula