शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर प्रकल्प मुदतीआधी पूर्ण करणार; एकनाथ शिंदे यांचा विश्‍वास 

शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर प्रकल्प मुदतीआधी पूर्ण करणार; एकनाथ शिंदे यांचा विश्‍वास 

मुंबई : मुंबई महानगर (एमएमआर) प्रदेशातील वाहतुकीला गती देण्याबरोबरच या संपूर्ण क्षेत्राला जवळ आणण्यासाठी महत्त्वाचा असलेला देशातील सर्वाधिक लांबीचा, शिवडी-न्हावा शेवा ट्रान्सहार्बर प्रकल्प मुदतीपूर्वी अर्थात सप्टेंबर 2022 पूर्वीच पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता.4) येथे व्यक्त केला. मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर कमी करण्याबरोबरच वाहतूककोंडीतूनही मोठा दिलासा मिळेल, असेही शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी केली. 100 वर्षे टिकेल अशा पद्धतीने या पुलाची बांधणी करण्यात येत असून, तीन-तीन मार्गिकेच्या 22किमी लांबीच्या या सागरी मार्गाचे जवळपास 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. 17 हजार कोटींचा हा प्रकल्प असून वित्त पुरवठ्यासाठी जायका समवेत करार झाला असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. मुंबईहून पुणे, गोवा, अलिबाग तसेच प्रगतीपथावर असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जलदगतीने जाण्यासाठी या ट्रान्सहार्बर लिंकचा उपयोग होणार आहे. मुंबईकडील बाजूने तो कोस्टल रोडलाही जोडण्यात येणार आहे. त्यासाठी एमएमआरडीए शिवडी-वरळी कनेक्‍टर प्रकल्पही स्वतंत्ररित्या राबवत असून त्या कामाचा कार्यादेशही लवकरच देण्यात येणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले. या पाहणीवेळी एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आणि एलअँडटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते. 

तीन पॅकेजमध्ये ट्रान्सहार्बर प्रकल्पाचे काम सुरू असून पॅकेज 1 एलअँडटी व आयएचआय कंसोर्शिअम, पॅकेज 2 देऊ ईअँडसी व टाटा प्रोजेक्‍ट्‌स जेव्ही आणि पॅकेज 3 एलअँडटी करत आहेत. कोरोना काळातही कामाच्या गतीवर परिणाम होऊ दिलेला नाही. सप्टेंबर 2022 पूर्वीच हे काम पूर्ण होईल. 
- एकनाथ शिंदे,
नगरविकासमंत्री

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com