डोंबिवलीत पाणीप्रश्न पेटणार; नांदिवलीच्या समस्येवरुन शिवसेना-मनसेत वाद| Dombivali news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water tank issue

डोंबिवलीत पाणीप्रश्न पेटणार; नांदिवलीच्या समस्येवरुन शिवसेना-मनसेत वाद

डोंबिवली : रस्ते विकास कामांच्या श्रेयवादानंतर आता डोंबिवलीत पाणी प्रश्न (Water problem in dombivali) पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. नांदिवली (Nandivali) परिसरातील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी पिंपळेश्वर मंदिर येथील पाण्याच्या टाकीवरुन जलवाहिनीद्वारे नागरिकांना पाणी पुरविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने (KDMC) घेतला आहे. या कामाची सुरुवात होणार तोच शिवसेना- (Shivsena-mns dispute) मनसे पदाधिकाऱ्यांत वाद झाला आणि नांदिवलीकर पाण्यापासून वंचितच राहीले.

डोंबिवली ग्रामीण भागातील नांदिवली टेकडी परिसरात पाणी टंचाईचा सामना गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना करावा लागत असून टॅंकरच्या पाण्यावर नागरिकांना अवलंबून रहावे लागत आहे. येथील लोकवस्ती वाढली मात्र त्या तुलनेत इतर सोयीसुविधा अपुऱ्या आहेत. टेकडी परिसरात पाण्याची टाकी नसल्याने, जलवाहिन्या जुन्या असल्याने तसेच पाण्याचा पुरेसा दाब नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.

यावर तातडीची उपाययोजना म्हणून पिंपळेश्वर मंदिर येथील पाण्याच्या टाकीत पाणीसाठा करुन पुढे पंपाद्वारे पाणी उचलून जलवाहिनीद्वारे ते पाणी नांदिवली परिसरात पोहोचविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्याचे काम पूर्ण करुन महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नांदिवलीकरांना पाण्याची भेट देण्यात येणार होती. मात्र आदल्या रात्रीच शिवसेना मनसे पदाधिकाऱ्यांत या पाण्याच्या प्रश्नावरुन वाद झाला, या वादात पालिकेचे काम रखडल्याने नांदिवलीकर महाशिवरात्रीला पाण्यापासून वंचितच राहीले असल्याचे दिसून आले.

शिवसेना मनसेत वाद

सोमवारी रात्री मनसेचे रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष ओम लोके हे पाण्याच्या टाकीवर गेले होते. त्यावेळी तेथे शिवसेनेचे ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे हे देखील आले. शिवसेनेच्या नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना त्यांचे काम करु द्या आपण बाहेर जा असे सांगितल्याने त्यांच्यात वाद उफाळला. या वादाचा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

ग्रामीण भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात असून नांदिवली टेकडी हा भाग जास्त बाधित आहे. तातडीची उपाययोजना म्हणून पालिका प्नशासनाने पिंपळेश्वर मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीत पाणी साठा करुन ते पुढे टेकडीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. या मागणीसाठी माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. आज ते काम पूर्णत्वास येऊन नागरिकांना पाणी पुरवठा होणार होता. मात्र आदल्या दिवशीच मनसेचे ओम लोके येथे आले आणि स्टंटबाजी करु लागले. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. त्यानंतर प्रसिद्धीचा स्टंट म्हणून काही व्हिडीओ त्यांनी व्हायरल केले. मात्र त्यांना मी कोणतीही शिविगाळ केली नसून त्यांच्या पक्षातील वरिष्ठांच्या कानावर मी ही गोष्ट घातली आहे.

- प्रकाश म्हात्रे, शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख

विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अशा स्वरुपाचे हमले, धमकी येणे या घटना वारंवार शहरात घडत आहेत. हे करुन सत्ताधाऱ्यांना दहशत निर्माण करायची आहे का? असे होऊ नये यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांची भेट घेऊन त्यांना घटना सांगितली. शहरात हे असेच चालू राहीले तर सर्व विरोधी पक्ष एक होऊन आम्ही आंदोलन करु अशी भूमिका त्यांच्या समोर मांडली आहे. तसेच मानपाडा पोलिस ठाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार देखील दाखल करणार आहोत.

- मनोज घरत, डोंबिवली शहर प्रमुख, मनसे

टॅग्स :Shiv Senamnsdombivali