esakal | सेना भवन राडा: "शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली"
sakal

बोलून बातमी शोधा

सेना भवन राडा: "शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली"

सेना भवन राडा: "शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली"

sakal_logo
By
विराज भागवत

"बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला..."; भाजप नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

मुंबई: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (Ram Mandir) बांधणीसाठी खरेदी केलेल्या जमिनीत घोटाळा (Scam) झाल्याचे आरोप आपच्या (AAP) नेत्यांनी केले. त्यानंतर मंदिर बांधणीबाबत भ्रष्टाचार होत असल्याबद्दल संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून व्यक्त केला. तसेच, अनेक शिवसेना नेत्यांनी याप्रकरणी काही वक्तव्ये केली. या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या गेलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाबाहेर फटका आंदोलन केले. पण या ठिकाणी आंदोलन करून देणार नाही असं सांगत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेदरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्यांशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वाईट वर्तणूक केली असा आरोप करत भाजपच्या एका महिला कार्यकत्याने शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. घटलेल्या या सर्व घटनेवर भाजप नेत्यांकडून अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. (Shivsena Bhavan Ugly Fight BJP Leaders Angry fuming reactions)

हेही वाचा: भाजप-शिवसेनेमध्ये तुफान राडा; शिवसेना भवनासमोर घडला प्रकार

"राम मंदिर उभारणीला बदनाम कोण करतंय? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, आम आदमी पार्टी, डावे... हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक पक्ष आहेत. त्यांना राममंदिर नकोच होते. आता हे एकवटलेत मंदिर उभारणीत विघ्न आणायला. त्यात भर पडली आहे, ज्वलंत टिपूवादी शिवसेनेची. यांना लक्षात ठेवा... वसूलीसेनेने इटालियन काँग्रेसकडून राम मंदिर आंदोलन बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. बाबरप्रेमी पप्पू आणि पप्पूच्या मम्मीला खूष करण्यासाठी मंदिर उभारणीला बदनाम करण्याचे आणखीन प्रयत्न होतील. अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून जनतेने सावध रहावे", अशी दोन ट्विट्स करत आमदार अतुल भातखळकर यांनी आपला राग व्यक्त केला.

"महिलांचा सन्मान करणारी शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे? काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठे आता त्यांच्या वळचणीला बसत राम मंदीराचा त्रास होणारी आजची शिवसेना कुठे? सत्तेपाई सत्व गमावले", अशी टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी जे आंदोलन करत होते, ते आंदोलन पोलिसांना माहिती देऊन करत होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आणि नेले. त्यानंतर उर्वरित आंदोलनकर्त्यांवर शिवसेनेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मागून लपूनछपून हल्ला केला. पोलिसांच्या आडून एका महिलेवर हल्ला करणं यातून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवून दिली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षता तेंडुलकर या भाजपच्या महिला कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला केला. असले लपूनछपून हल्ले करण्याचा आम्ही निषेध करतो. रणांगणात आमनेसामने या, आम्ही तुम्हाला चारीमुंड्या चीत करू", अशा शब्दात आमदार अँड आशिष शेलार यांनी आपला राग व्यक्त केला.

"लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राम मंदिराबाबत सामनातील लिखाणासंदर्भात संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या रस्त्यावर आल्या असतील तर ते चुकीचे नाही. भाजप कार्यालयावरही मोर्चे आणि आंदोलने झाली पण आम्ही त्या आंदोलकांवर हल्ले कधीच केलेले नाहीत. अशा प्रकारे लोकशाही पद्धतीने आंदोलन करताना त्यांच्यावर हल्ले करणं अत्यंत लाजिरवाणं आहे. महिलांवर हल्ला करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे", अशी भूमिका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.

"हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भाजप भक्कम उभी आहे. भाजप कार्यकर्त्यांवर आणि आमच्या भगिनींवर हल्ला करणाऱ्यांवर उचित कलम लावण्यात आले आणि FIR दाखल झाली! आमच्या भाजप कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. भविष्यात असे काही झाल्यास जशास तसे उत्तर मिळेल!", असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिला.

दादर येथील शिवसेना भवनासमोर शांततेत आंदोलन करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर शिवसैनिकांच्या जमावाकडून झालेल्या भ्याड हल्याचा तीव्र निषेध. हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांना त्वरित अटक करून कार्यवाही करण्याची आमची मागणी आहे. कार्यवाही होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिला.

loading image