भाजपच्या आक्रमतेला यशवंत जाधवांची पुन्हा टक्कर; स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सेनेकडून उमेदवारी

तुषार सोनवणे
Wednesday, 30 September 2020

बीएमसीच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यपदाची निवडणूक येत्या 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यशवंत जाधव आणि संध्या जोशी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या लढतीसाठी शिवसेनेकडून पुन्हा यशवंत जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इतर अनेक नगरसेवकांनी या उमेदवारी साठी फिल्डिंग लावली होती. परंतु पक्षाने जाधव यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला आहे. जाधव यांची नियुक्ती झाल्यास ते तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. स्थायी समितीच्या उमेदवारी नंतर शिवसेनेने शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी संध्या जोशी यांना उमेदवारी दिली आहे. जोशी यांनी राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये काहीशी नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

भिवंडीत धोकादायक इमारतींची समस्या बिकट, एकूण 527 धोकादायक इमारती

बीएमसीच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यपदाची निवडणूक येत्या 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यशवंत जाधव आणि संध्या जोशी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जाधव यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यास त्यांच्या अध्यक्षपदाची हॅट्रीक होणार आहे. विद्यमान महापौर आणि जाधव यांच्यात खटके उडत असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात होत असतात. त्यामुळे यावेळी जाधव यांचा पत्ता कापला जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.  परंतु 28 सप्टेंबर रोजी समितीवरील निवृत्त सदस्यांच्या रिक्त जागी सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि राजुल पटेल यांना समितीवर कायम ठेवण्यात आले. तर सानप यांच्या जागी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना सदस्य म्हणून नेण्यात आले. त्यामुळे यशवंत जाधव यांनी सुबक खेळी करून आपली उमेदवारी जवळपास निश्चित केली होती. पक्षाच्या वतीने जाधव यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केल्याने त्यांची उमेदवारी कापली जाण्याच्या शंकांना पुर्णविराम मिळाला.

किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार अर्ज दाखल

राज्यात भाजप विरोधी पक्ष असल्यामुळे बीएमसीतही आक्रमक भूमिकेत आहे. शहरातील अनेक महत्वाच्या समस्यांवर भाजप महापालिकेत आक्रमक भूमिका घेते आणि त्यांना उत्तरे देण्यासाठी सेनेकडे जाधव यांच्याव्यतिरिक्त अन्य आक्रमक चेहरा नाही. त्यामुळे जाधव यांची पुन्हा वर्णी लागली आहे. 

स्थायी समितीतील संख्याबळ

शिवसेना : 11  अणिक एक शिक्षण समिती अध्यक्ष
भाजप  :  10
काँग्रेस  : 03
राष्ट्रवादी काँग्रेस : 01
समाजवादी पक्ष  : 01

शिक्षण समितीतील संख्याबळ

शिवसेना : 11
भाजप  :  09
काँग्रेस  : 04
राष्ट्रवादी  काँग्रेस : 01
समाजवादी पक्ष : 01

----------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena candidate for the chairmanship of the Standing Committee in BMC yashawant jadhav