राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा

राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोक या सदरात टीआरपी घोटाळा, फेक अकाऊंट्स आणि हाथरस प्रकरण, केंद्रीय मंत्री अमित शहा या विषयांवर भाष्य केलं आहे. 

काय आहे आजच्या रोखठोक सदरात

  • अमित शाह आज देशाचे गृहमंत्री आहेत. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे त्यांनी मान्य केले पाहिजे. राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो. अमित शाह यांनीच एका कार्यक्रमात सांगितले होते, 'आम्ही कोणतीही बातमी आमच्या हजारो ‘व्हॉटस्ऍप’ ग्रुपच्या माध्यमांतून पटवून देऊ शकतो' हा आत्मविश्वास एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून ठीक आहे, पण आज देशाची सूत्रे आपल्या हाती आहेत हे त्यांना विसरता येणार नाही. 
  • ज्या सोशल मीडियाने मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांना निकम्मे ठरवले, त्याच सोशल मीडियावर रिकाम्या बोगद्यात लष्करी गाडीवर उभे राहून आपले पंतप्रधान हात हलवत पुढे निघाले असल्याचा ‘व्हिडीओ’ व्हायरल झाला व पंतप्रधानांची प्रचंड खिल्ली उडवली गेली. हे बरोबर नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, सेनाप्रमुख, पोलीस यांना ‘टार्गेट’ करणे म्हणजे देशाच्या भवितव्याचा खड्डा खणण्यासारखे आहे.  सुशांतप्रकरणी एकट्या मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् निर्माण केली जातात. म्हणजे अशा प्रकारची किमान पाच कोटी फेक अकाऊंटस् सोशल मीडियावर सक्रिय आहेत. हे बेकायदेशीर काम कायद्यानेच थांबवायला हवे. देशाच्या गृहमंत्र्यांनी त्यात पुढाकार घ्यावा. सुरुवात स्वतःच्या पक्षापासून करावी लागेल. 
  • मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेवर आणि इमानदारीवर या काळात मोठा हल्ला चढवला गेला.  सोशल मीडियावर तब्बल 80 हजार किंवा त्यापेक्षा जास्त ‘फेक अकाऊंटस्’ उघडून पोलिसांची, महाराष्ट्र सरकारची, ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. यातील बहुतेक खाती तुर्कस्तान, जपान, इंडोनेशिया अशा देशांतून चालवली गेली हे समोर आले. हे सर्व कोणाच्या इशाऱ्याने आणि मार्गदर्शनाखाली चालले होते त्याचा गौप्यस्फोट करण्याची गरज नाही. ज्यांनी समाज माध्यमांतून राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवले, मनमोहन सिंग यांना ‘मौनी बाबा’ ठरविले, त्याच लोकांनी सुशांतचे आत्महत्या प्रकरण एक पर्वणी मानले. सुशांतला न्याय वगैरे देण्याच्या भानगडीत त्यांना पडायचे नव्हते. सुशांतनिमित्ताने त्यांना पोलीस, सरकार आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करायची होती. राजकारणात बदनामी आणि चारित्र्यहनन हेच सगळ्यात मोठे हत्यार आहे आणि सोशल मीडिया त्या हत्याराचा कारखाना बनला आहे. 
  • हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीची सोशल मीडियावर सरळ बदनामी करण्यात आली आणि हे सर्व राजकीय पक्षाच्या पाठबळाने झाले. हाथरसच्या त्या पीडित मुलीचा व्हिडीओ सर्वप्रथम अमित मालवीय यांनी ट्विटरवर टाकला. हे मालवीय कोण तर भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख. डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे महत्त्वाचे नेते. डॉ. स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी अमित मालवीय यांच्यावर हल्ला केला. मालवीय हे बोगस ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या बदनामीची मोहीम चालवीत आहेत, पण स्वामी यांनी तक्रार करूनही मालवीय यांच्यावर कारवाई झाली नाही. कारण सायबर फौजा आणि त्या फौजांचे बेबंद हल्ले हे भाजपसह अनेकांचे राष्ट्रीय धोरणच झाले आहे.
  • मागच्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुका भाजपने याच सायबर फौजांच्या मदतीने जिंकल्या. गोबेल्सलाही लाज वाटेल असे जहरी प्रचार तंत्र राबविण्यात आले. मोदी यांच्यासमोर उभा ठाकलेला प्रत्येक जण निकम्माच आहे हे या माध्यमातून ठसविण्यात आले. या माध्यमाचा हा सरळ सरळ गैरवापर आहे. 
  • कंगना या नटीने मुंबईस ‘पाकिस्तान’ म्हटले व त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा माझ्या फोनवर घाणेरडे संदेश पाठविणारे बहुतेक नंबर परदेशातले होते. हे सर्व ठरवून झाले. सुशांत प्रकरणातील ऐंशी हजार फेक अकाऊंटसपैकी ते नंबर असायला हरकत नाही. 
  • उत्तर प्रदेशात ‘हाथरस’ बलात्कारकांड घडले, त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. आता मुख्यमंत्री योगी यांनी जाहीर केले, ‘‘हाथरसकांड हे उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करण्याचे, जातीय दंगे भडकवण्याचे एक आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे.’’ हाथरसकांडासाठी बाहेरच्या देशातून पैसे आले असे आता पसरविले जात आहे. ज्यांचा हाथरसशी संबंध नाही ते गावात आले व त्यांनी हे सर्व घडविले असे सांगितले गेले. मग सुशांत प्रकरणातदेखील बाहेरच्या लोकांनीच हस्तक्षेप केला व त्यांनी हे प्रकरण चिथावले असे बोलले गेले तेव्हा कोणी मानायला तयार नव्हते.
  • सुशांतप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे आंतरराष्ट्रीय कारस्थान होते व त्यात परदेशी पैसा वापरला गेला. मुंबईतील सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या एका नटीने या कारस्थानाचे नेतृत्व केले व तिच्या दिमतीला भाजपने ‘आयटी सेल’ उभा केला. या सगळय़ात महाराष्ट्र राज्यच बदनाम होत आहे याचे भानही कुणाला राहिले नाही. 80 हजार फेक अकाऊंटस् उघडून त्यातून महाराष्ट्रविरोधी मोहीम पद्धतशीर राबविली गेली. आपल्या देशात ‘आंतरराष्ट्रीय’ स्तरावरचा राजकीय पक्ष कोणता व जगभरात आमच्या शाखा आहेत, असे अभिमानाने सांगणारा पक्ष कोणता हे नव्याने सांगण्याची गरज नाही. 

Shivsena mp Sanjay Raut targets home minister Amit Shah saamana Rokthok 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com