आदित्य ठाकरे म्हणतात, 'केम छो वरली'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा स्वतःच केली असून, मतदार संघामध्ये 'केम छो वरली' असे पोस्टर लागले आहेत.

मुंबईः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा स्वतःच केली असून, मतदार संघामध्ये 'केम छो वरली' असे पोस्टर लागले आहेत. मराठीचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या ठाकरेंचा गुजराती प्रचार पाहून नेटिझन्सनी टिकेची झोड उठवली आहे.

सोशल मीडियावर 'केम छो वरली'चे पोस्टर व्हायरल होऊ लागली आहेत. मराठी मतांसोबतच या परिसरातील गुजराती मते मिळवण्यासाठी व गुजराती समाजाला आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून ही पोस्टरबाजी करण्यात आल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत. वरळी मतदारसंघात गुजराती समाजाची चांगली मते आहेत. गुजराती समाजाची मतं आदित्य ठाकरे यांना मिळावी यासाठी शिवसेनेने 'केम छो वरली' असे पोस्टर झळकावल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) समर्थक असलेले तुषार खरे यांनी हे पोस्टर आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. मात्र, छायाचित्र शेअर करताना ते कोणत्या भागात लावण्यात आले याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हे बॅनर खरे आहे की खोटे यासंबंधी अद्याप माहिती समोर आली नाही. परंतु, ट्विटरवरील या छायाचित्रामुळे शिवसेनेने निवडणूकीच्या तोंडावर गुजराती प्रेम दाखवल्याने अनेकांनी शिवसेनेवर टीका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena poster on came cho warli in mumbai viral social media