esakal | नाहीतर लोक प्रॉपर्टी चोरुन नेतील, शिवसेनेचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

नाहीतर लोक प्रॉपर्टी चोरुन नेतील, शिवसेनेचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा

पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते, असं म्हणत शिवसेनेनं त्यांना टोला लगावला आहे.

नाहीतर लोक प्रॉपर्टी चोरुन नेतील, शिवसेनेचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते, असं म्हणत शिवसेनेनं त्यांना टोला लगावला आहे. काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर हा पत्राचा मुद्दा काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीतही गाजला. आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

अग्रलेखात शिवसेनेनं काय म्हटलं?

  • काँग्रेसच्या 23 प्रमुख नेत्यांच्या पत्राने निर्माण केलेले वादळ तूर्त थडांवले आहे असे दिसते. मुळात पक्षात वादळ निर्माण करण्याची क्षमता काँग्रेस पक्षातील एखाद्या नेत्यात तरी उरली आहे काय? काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी करणारे एक पत्र जुन्या काँग्रेस पुढाऱ्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले. ज्यांनी हे पत्र लिहिले, त्या सर्व नेत्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यापैकी एकही नेता देश पातळीवर, राज्य पातळीवर सोडाच, पण जिल्हा पातळीवरदेखील लोकांचा नेता नाही. तरीही यापैकी अनेक नेत्यांनी काँग्रेस किंवा गांधी-नेहरू परिवाराच्या बळावर मुख्यमंत्री पदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत. 
  • पी. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत, पण ते नेते कधी झाले? राजीव गांधींशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली होती व तामीळनाडूत स्वतःचा पक्षही काढला होता, पण लोकांचे समर्थनच नसल्याने त्यांना हा पक्ष गुंडाळावा लागला. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा हे जुनेजाणते नेते आहेत. शर्मा यांनी तरुणपणात काँग्रेससाठी खस्ता खाल्ल्या तशा श्री. आझाद यांनीही खाल्ल्या. कपिल सिब्बल यांनी अनेक वर्षे पक्षाची कायदेशीर बाजू भक्कमपणे सांभाळली, पण या घडीस राजकारणातील त्यांची सद्दी संपली आहे. 
  • अहमद पटेल हे उत्तम ‘मॅनेजर’ किंवा ‘सल्लागार’ आहेत, पण लोकनेते नाहीत. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते. आता पक्षाला सक्रिय करायचे म्हणजे काय व पक्षाला सक्रिय करण्यासाठी या ‘पत्रनेत्यां’ना कोणी रोखले आहे?
  • 70 वर्षांच्या सोनिया गांधी यांनी पक्षांतर्गत संगीत खुर्ची, खो-खो, हुतुतू, आट्यपाट्यांचे सामने भरवून सक्रियता दाखवावी असे या मंडळींना वाटते काय? दुसरे असे की, राहुल गांधी हे सक्रिय होतेच व त्यांनी एकाकीपणे मोदी-शहांना अंगावर घेतले. विधानसभा निवडणुकांत त्यांनी देश पालथा घातला. भाजपकडून त्यांच्यावर कमरेखालचे हल्ले झाले तेव्हा हे सक्रिय ‘पत्र पुढारी’ कुठे होते? राहुल गांधी यांचे खच्चीकरण मोदी-शहांच्या भाजपने केले नसेल तेवढे पक्षांतर्गत जुन्या कोंडाळय़ाने केले आहे. 
  • राहुल यांचे नेतृत्व मारायचे व कुजवायचे या राष्ट्रीय षड्यंत्रात घरभेदी सामील होतात तेव्हा पक्षाचे पानिपत नक्कीच होत असते. राहुल गांधी यांनी त्याच संतापातून लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. राहुल व प्रियंकाचे म्हणणे तेच होते…आता हा पक्ष तुम्हीच चालवा, वाटल्यास गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष नेमा. राहुल यांनी हे अत्यंत खुलेपणाने सांगितले व त्यात कोणतीही कटुता नव्हती. मग या आव्हानाचा सामना ‘पत्र पुढाऱ्यां’नी का केला नाही? काँग्रेसची जबाबदारी पुन्हा जर्जर प्रकृतीच्या सोनिया गांधींवर टाकून हे सर्व जुनेजाणते मोकळे झाले. एकही ‘माई का लाल’ पुढे येऊन काँग्रेसचे आपत्कालीन नेतृत्व करण्यास तयार झाला नाही.
  • सोनिया गांधी, राहुल गांधी यावर काय करणार? म्हणूनच ‘पत्र पुढाऱयां’नी घेतलेल्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळू शकला नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीतील वादळ व आधीचे पत्रप्रयोग म्हणजे आडगावच्या चार हौशा-गवशांनी बसविलेला ‘एकच प्याला’ या नाटकाचा रेंगाळलेला प्रयोग होता. नाटक नीट बसले नाही व पात्रांच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांनी नाटक जागेवरच बंद पाडले, पण नवा प्रयोग नव्या संचात राहुल गांधींनी लवकरच राजकीय मंचावर आणला नाही तर लोक नाटकाचे पडदे आणि प्रॉपर्टी चोरून नेतील!

Shivsena saamana editorial criticize congress leader prithviraj chavan milind deora