बेलापूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

पालिकेच्या बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पोटे यांना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या आदेशावरून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नवी मुंबई : पालिकेच्या बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पोटे यांना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या आदेशावरून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मिसाळ यांनी बुधवारी (ता.२५) संध्याकाळच्या सुमारास बेलापूरच्या रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती. याप्रसंगी मिसाळ यांना रुग्णालयातील डॉक्‍टर व परिचारिका गैरहजर, औषधे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मिसाळ यांनी पोटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, २४ तासांच्या आत प्रशासनाला लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

बेलापूर येथील शंभर खाटांचे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्‍यक डॉक्‍टर, यंत्रणा व परिचारिकांची भरती करण्याचे काम वेगात सुरू आहे. तसेच प्रशासनातर्फे मुबलक कर्मचारीही बेलापूरच्या रुग्णालयात नियुक्त केले आहेत. या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी मिसाळ यांनी बुधवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक बेलापूरच्या रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान दोन बालरुग्ण उपचाराकरीता दाखल झाले असून, डॉ. पोटे गैरहजर असल्याचे दिसून आले. यावेळी दोन डॉक्‍टर आणि परिचारिका हजर होत्या. तसेच रुग्णालयात सर्वत्र दिवे बंद करून काळोख करून ठेवल्याचे मिसाळ यांच्या पाहणीत निदर्शनास आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Show cause notice to medical officer of Belapur