उद्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणार आहात? आधी ही बातमी वाचा, मग प्लॅन करा

सुमित बागुल
Thursday, 31 December 2020

उद्या १ जानेवारी २०२१, नवीन वर्षाची सुरवात. अशात तुम्ही उद्या जर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तुमचा प्लॅन आजच बदला.

मुंबई : उद्या १ जानेवारी २०२१, नवीन वर्षाची सुरवात. अशात तुम्ही उद्या जर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तुमचा प्लॅन आजच बदला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्यातील अनेक जण मंदिरात जाऊन देवासमोर नतमस्तक होतात आणि येणारं वर्ष सुख, समाधान आणि समृद्धीचं जावो अशी प्रार्थना करतात.

मुंबईकरांचं लाडकं दैवत म्हणजे मुंबईतील प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर. मंदिरात अनेकजण बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. मात्र यंदा एक जानेवारीला मंदिरात जाऊन तुम्हाला बाप्पाचं दर्शन घेता येईलच असं नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुखत्वे विशेष सोय करून एक तारखेला फक्त ऑनलाईन दर्शनाची सोय भाविकांसाठी करण्यात आली आहे.  

महत्त्वाची बातमी : "आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा", संजय राऊत आक्रमक

दरवर्षी, एक जानेवारीला प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला मोठ्या प्रमाणात नागरिक दरवर्षी जात असतात.मात्र यंदा जानेवारीच्या एक तारखेला सिद्धिविनायक मंदिर प्रत्यक्ष दर्शनासाठी पूर्णपणे खुलं नसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंदिर सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. यामध्ये ज्या नागरिकांनी QR कोड घेऊन दर्शनाची वेळ निश्चित केली आहे अशांनाच केवळ बाप्पाचं प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे.     

कशा असतील दर्शनाच्या वेळा : 

  • सकाळी - सात ते बारा 
  • दुपारी - साडेबारा ते सायंकाळी सात
  • रात्री - आठ ते नऊ 

ज्यांच्याकडे QR कोड आहे अशांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. मिळालेला QR कोड हा कुणीही दुसऱ्याला देऊ शकत नाही, कारण हा QR अहस्तांतरित आहे. म्हणजेच तुम्ही हा QR कोड कुणालाही WhatsApp  वर पाठवला किंवा स्कॅन कॉपी पाठवली तर चालणार नाही. दरम्यान एक आनंदाची बातमी म्हणजे याआधी एका तासाला 250 नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता. मात्र आता हीच संख्या 800 भाविक प्रति तास करण्यात आली आहे. 

मुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांना प्रत्यक्ष बाप्पाच्या चरणी येण्याची संधी मिळणार नाही अशांनी ऑनलाईन पद्धतीने घरूनच बाप्पाचे दर्शन घ्यावे. सोबतच ज्यांनी नोंदणी केली आहे. मात्र दर्शनाला येऊ शकत नाहीत अशांनी आपली नोंदणी रद्द केल्यास इतर नागरिकांना दर्शनासाठी येता येईल. सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या वतीने हे आवाहन करण्यात आलं आहे . 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: siddhivinayak temple of prabhadevi will remain close for walk in prayers rules to avoid spread of covid