मिरा-भाईंदरमध्ये घरांसाठी महापालिकेला घेराव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

मिरा रोड ः मिरा-भाईंदर महापालिकेकडून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना दहा वर्षांपासून रखडल्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी शुक्रवारी (ता.१३) आयुक्त कार्यालयाला घेराव घातल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. 

मिरा रोड ः मिरा-भाईंदर महापालिकेकडून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना दहा वर्षांपासून रखडल्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी शुक्रवारी (ता.१३) आयुक्त कार्यालयाला घेराव घातल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. 

मिरा-भाईंदर महापालिकेने काशीमिरा येथील जनतानगर आणि काशी चर्च झोपडपट्टी येथे २००९ ला बीएसयूपी योजनेच्या कामाला सुरुवात केली; परंतु १० वर्षे उलटूनही अद्याप योजना रखडली आहे. ही योजना भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय अनास्थेमुळे रखडलेली असून यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असा रहिवाशांचा आरोप आहे. या योजनेत ४ हजार १७६ घरे होती. प्रत्यक्षात काशी गावात आठ मजल्याची एक इमारत तयार झाली असून यात दोनशेच्या आसपास राहिवाशांना घरे देण्यात आली आहेत; तर चार इमारती निधीअभावी अर्धवट अवस्थेत आहेत. 

जनतानगर, काशी चर्च येथील रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीन वर्षांची वेळ दिली होती; परंतु १० वर्षे उलटूनही अद्यापपर्यंत ही योजना पूर्ण झालेली नाही आणि कधी पूर्ण होईल, याची शाश्‍वती देता येत नाही. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. येथील काही रहिवाशांना लोढा येथे; तर काहींना पिनाकोला येथील एमएमआरडीएच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात घरे दिली आहेत; तर काही रहिवाशांची घोडबंदर येथील १०० फुटांच्या पत्र्याच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये व्यवस्था केली आहे. 

नागरिकांना दिलेली घरे अत्यंत लहान असून तेथे अपुऱ्या सुविधा आहेत. पाणी, कचरा, लिफ्ट अशा अनेक समस्यांमुळे आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेले रहिवासी ‘हमारा घर हमारा अधिकार’ ही संस्था बनवून एकत्र आले आहेत. येथील रहिवाशांनी आयुक्तांची भेट घेण्यासाठी आजची वेळ घेतली होती; परंतु आयुक्त बालाजी खतगावकर पालिकेत फिरकलेच नाहीत. त्यामुळे सुमारे ५०० संतप्त रहिवाशांनी आयुक्त व महापौर कार्यालयाला घेराव घातला. या वेळी उपस्थित शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनी समस्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siege of Municipal Corporation for houses in Mira-Bhayander