सर्वसामान्यांना लोकलसाठी प्रवासी संघटना सक्रिय; राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सह्यांची मोहीम 

कुलदीप घायवट
Saturday, 16 January 2021

राज्य सरकार लोकल प्रवास सुरू होईल, अशी आशा दाखवून पुढची तारीख देत आहे. त्यामुळे आता सरकारने लवकरात लवकर लोकल सुरू करावी, यासाठी रेल्वे प्रवासी आणि संघटनांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. 

मुंबई  : मागील दहा महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास बंद आहे. त्यामुळे पर्यायी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. राज्य सरकार लोकल प्रवास सुरू होईल, अशी आशा दाखवून पुढची तारीख देत आहे. त्यामुळे आता सरकारने लवकरात लवकर लोकल सुरू करावी, यासाठी रेल्वे प्रवासी आणि संघटनांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. 

राज्य सरकारकडून अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी, काही विशेष सेवेतील कर्मचारी यांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. महिलांना सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7 ते शेवटच्या लोकलपर्यंत लोकल प्रवासाची परवानगी आहे, तर सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची अद्याप परवानगी नाही. आता कोरोना लस आली आहे. त्यामुळे लस प्रत्येकाला देऊन सरसकट लोकल सुरू करावी, अशी भूमिका रेल्वे संघटनांनी मांडली आहे. 

 

सरकार आणि रेल्वे प्रशासन प्रवाशांकडे दुर्लक्ष करत आहे. राजकीय नेतेही कोणता पाठपुरावा करत नाही. समाजमाध्यमांतून, पत्रव्यवहार करून, आंदोलन करून प्रशासन सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे आता सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. सर्व रेल्वे प्रवासी सह्या करून सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. 
- नंदकुमार देशमुख,
अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ) 

 

उपनगरीय लोकल सेवा सरसकट रेल्वे प्रवाशांसाठी सुरू करावी. अन्यथा सीएसएमटी येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर 26 जानेवारीला  उपोषण केले जाईल. 
- अभिजित धुरत,
अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ 

Signature campaign to get the attention of the state government for local train travels

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signature campaign to get the attention of the state government for local train travels