BMC च्या सुट्टी धोरणाविरोधोत सायनच्या डाॅक्टरांचा निषेध; सात दिवस निषेध नोंदवणार

भाग्यश्री भुवड
Thursday, 10 September 2020

कोव्हिड सेवेत असणाऱ्या पालिकेच्या डाॅक्टरांना केवळ एका दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मुंबई : कोव्हिड सेवेत असणाऱ्या पालिकेच्या डाॅक्टरांना केवळ एका दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गुरूवारपासून (ता. 10) त्याच्या अंमलबजावणीस सुरूवातही झाली आहे. या निर्णयाविरोधात सायन रुग्णालयाच्या मार्ड संघटनेने शुक्रवारपासून सात दिवस निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाडलेले बांधकाम जैसे थे; उच्च न्यायालयाचा कंगना आणि महापालिकेला आदेश

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर डाॅक्टरांना लगेच नाॅन कोव्हिड रुग्णाच्या सेवेसाठी हजर व्हायचे आहे. मात्र, कोव्हिड ड्युटीवर असताना डॉक्टरांना अनेक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे डॉक्टरांचा विश्रांतीचा कालावधी कमी करू नये, अशी मागणी सायन हॉस्पिटलमधील मार्डने केली आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी  हॉस्पिटलमधील ओपीडी, वॉर्ड आणि शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर डाव्या हाताला काळी फिती बांधून निषेध नोंदवणार आहेत. तर, दुसर्‍या दिवशी डाॅक्टरांना आलेले नैराश्य दर्शवण्यासाठी निळी फित, चिंतेसाठी हिरवी फित, रागासाठी लाल फित, सचोटीसाठी गडद निळा, आशावाद यासाठी पिवळी आणि शेवटच्या दिवशी सफेद रंगाची फित लावणार असल्याचे सायनच्या मार्ड संघटनेकडून सांगण्यात आले.

 

निवासी डॉक्टरांना विश्वासात घेऊन पालिकेकडून निर्णय घेतला जात नाही. कोव्हिड रुग्णसेवा  बजावणाऱ्या निवासी डॉक्टरांचे शैक्षणिक अभ्यासक्रम रखडले आहेत. तरीसुद्धा त्यांच्यावर शैक्षणिक शुल्कासाठी सक्ती केली जात आहे. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून निवासी डाॅक्टर रुग्णसेवेत असल्याने त्यांचे प्रबंध होऊ शकले नाही. विद्यापीठाकडूनही त्याबाबत काही निर्णय होत नाही. त्यामुळे डॉक्टरांमध्ये मानसिक तणाव आणि नैराश्य येत आहे.
- डॉ. दीपक मुंढे,
अध्यक्ष, केईएम मार्ड

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sions doctors protest against BMCs holiday policy Will protest for seven days