महड विषबाधा प्रकरणी आरोपी महिलेला सहा दिवसांची कोठडी

मनोज कळमकर
रविवार, 24 जून 2018

महड विषबाधा प्रकरणात गुन्ह्याची कबुली देणाऱ्या आरोपी प्रज्ञा सुरवशे या महिलेला सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

खालापूर : महड विषबाधा प्रकरणात गुन्ह्याची कबुली देणाऱ्या आरोपी प्रज्ञा सुरवशे या महिलेला सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शनिवारी खालापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर आरोपी महिलेला हजर करण्यात आले होते. खालापूर तालुक्‍यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरविणाऱ्या महड येथील विषबाधा प्रकरणात पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास केला. 

रायगड पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, खालापूरचे पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे जमील शेख, महिला पोलिस उपनिरीक्षक अंबिका अंधारेसह पोलिस कर्मचारी तपासकार्यात गुंतले होते. तीन संशयितांची कसून चौकशी करून पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. अखेर पोलिसांना प्रज्ञा सुरवशेपर्यंत पोहचण्यात यश मिळाले. 

असा झाला उलगडा... 

सुभाष माने यांच्याशी वाद झालेल्या शेजारच्या व्यक्तीवर पोलिसांना संशय होता. "तुझ्या पुजेत गोंधळ घालतो', अशी धमकी त्याने दिली होती; परंतु पोलिस तपासात हा संशयित वक्‍तव्यावर ठाम राहिल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. माने यांच्या घरी पोलिस तपासाला गेले की, प्रज्ञा आजूबाजूला घुटमळते हे पोलिसांनी हेरले होते. शिवाय, जेवण वाढायला प्रज्ञा पुढे होती, अशी माहिती माने यांनी दिली होती.

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून प्रज्ञा दुसऱ्या दिवशी खोपोली येथील खासगी दवाखान्यात दाखल झाली. विशेष लक्षणे न आढळल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर पोलिसांचा संशय बळावला. अखेर सखोल चौकशी करताच प्रज्ञाने डाळीत विष टाकल्याची कबुली दिली.

शेजारचे लोक जेवण करून गेल्यावर घरातील मंडळी जेवतील, असा अंदाज बांधून प्रज्ञाने डाळीत फोरेट टाकले; परंतु शिंदे कुटुंबातील मुले जेवायला बसल्यानंतर प्रज्ञाने बादली लाथ मारून डाळ सांडविण्याचा प्रयत्न करत असताना नणंदेने तिला हटकले आणि पुढची घटना घडली. 

Web Title: The six day police custody of a woman accused in a poisoning case