मुंबईचं कुटुंब गोव्यात; सहा वर्षांचा मुलगा पूलमध्ये उतरला अन् डोळ्यादेखत.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 swimming pool death

काही क्षणातच चिमुकल्याचा बुडून मृत्यू

मुंबईचं कुटुंब गोव्यात; सहा वर्षांचा मुलगा पूलमध्ये उतरला अन् डोळ्यादेखत..

कळंगुट : कांदोळी येथे एका रिसॉर्टमधील स्विमिंगपूलमध्ये रेवाज जैन या सहा वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. या घटनेमुळे स्विमिंगपूलच्या ठिकाणी जीवरक्षक असतात की नाही, याच्या चौकशीची गरज निर्माण झाली आहे.

कळंगुट पोलिसांनी सांगितले, की रविवारी संध्याकाळी मुंबई येथील उर्वज जैन आपली पत्नी तसेच मुलगा रेवाजसह गोव्यात सहलीसाठी आले होते. ते कांदोळी येथील एका नामांकित हॉटेलात राहात होते. मंगळवारी दुपारी जैन पती-पत्नी मुलासह स्विमिंगपुलाच्या कठड्यावर बसलेले होते. यावेळी रेवाज त्यांच्या डोळ्यांदेखत पुलामध्ये उतरला. मात्र, तो पाण्यातून वर येत नसल्याचे लक्षात येताच त्या दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरड केली.

त्यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पुलात उडी घेत रेवाजला बाहेर काढले. त्याला कांदोळीतील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने कांदोळीतील पंचतारांकित हॉटेलमधील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. स्विमिंगपूलची व्यवस्था असलेल्या प्रत्येक ठिकाणी जीवरक्षक नियुक्त करण्याची मागणी होत आहे.