कोपरखैरणेत इमारतीचा स्लॅब कोसळला; गरोदर महिलेची प्रकृती चिंताजनक 

विक्रम गायकवाड
Tuesday, 1 December 2020

कोपरखैरणे सेक्‍टर-19 बी मधील सिल्वर सॅंड सोसायटी या इमारतीतील तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावरील बेडरुमचा स्लॅब पहिल्या मजल्यावरील बेडरुममध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.1) दुपारी घडली

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्‍टर-19 बी मधील सिल्वर सॅंड सोसायटी या इमारतीतील तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावरील बेडरुमचा स्लॅब पहिल्या मजल्यावरील बेडरुममध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.1) दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकुन पडलेल्या सर्व जखमींना वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये एक गरोदर महिला असून, या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातील सुत्रांनी सांगितले. 

सत्तेसाठी मूळ विचारांना शिवसेनेची तिलांजली, अजान स्पर्धेवरुन दरेकरांची टीका

कोपरखैरणे सेक्‍टर-19 बी मध्ये सिल्वर सॅंड या चार मजली इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील 301 क्रमांकाच्या रुममधील कमकुवत असलेल्या बेडरुमचा स्लॅब दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खाली कोसळला. यावेळी या घरातील नंदलाल त्रिंबके (45) व अनिता त्रिंबके (40) हे दोघे पती पत्नी घरातील सामानासह दुसऱ्या मजल्यावरील बेडरुमध्ये पडले. यावेळी दुसऱ्या मजल्यावरील घर बंद होते. मात्र वरून पडलेल्या स्लॅबचे वजनाने दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब पहिल्या मजल्यावरील बेडरुममध्ये कोसळला. यावेळी पहिल्या मजल्यावरील बेडरुममध्ये मिलिंद ठाकुर (40) आणि प्रिती झा (35) हे दोघे असल्याने वरुन पडलेले स्लॅब व सर्व सामान त्यांच्या अंगावर पडले. या दुर्घटनेत यावेळी ढिगाऱ्याखाली चौघेजण अडकून पडले होते. या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अड़कून पडलेल्या नंदलाल त्रिंबके, अनिता त्रिंबके, मिलिंद ठाकुर आणि प्रिती झा या चौघांना बाहेर काढले. त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा - कोरोनाचा परिणाम पुढच्या पिढीवरही; कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक

 

स्लॅब कोसळलेल्या सिल्वर सॅंड या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून, या इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडीट सुद्धा झाले नसल्याचे अग्निशमन दलाने केलेल्या तपासणी आढळुन आले आहे. दुर्घटनेनंतर या इमारतीच्या कॉलमना तडा गेल्याने ही इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे तिचा इतर भाग देखील कोसळण्याची शक्‍यता आहे. याबाबत आपण महापालिका विभाग कार्यालयाला लेखी पत्राद्वारे कळविणार आहे. 
- एकनाथ पवार,
सहाय्यक केंद्र अधिकारी, अग्निशमन दल, कोपरखैरणे.

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The slab of the building collapsed in the corner The condition of the pregnant woman is worrying