संथगती विकासकामांमुळे इच्छुकांपुढे आव्हान

चंद्रशेखर जाधव
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

प्रभाग फेररचनेमुळे दामूनगर प्रभाग २६ मध्ये येते. पाण्याची, शौचालयांची, राहण्याची (प्लास्टिक झोपड्या) व परिसरातील दुर्गंधी अशा अनेक समस्या तिथे आहेत. नगरसेविकेने कोणतेही काम हाती घेतले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या ठिकाणी लोकहिताची कोणतीही कामे झालेली नाहीत.
- दीक्षा घयाळ (सामाजिक कार्यकर्ती, दामूनगर)

कांदिवली पूर्व मतदारसंघात प्रभाग पुनर्रचनेमुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. सध्याच्या नगरसेवकांच्या प्रभागात बदल झाल्याने ते नव्या प्रभागाच्या शोधात आहेत. मतदारसंघातील विकासकामे संथ गतीने झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या इच्छुकांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे; मात्र आपण आपल्या प्रभागात चांगले काम केले आहे. आपली कामगिरी उत्तम असल्याचा दावा सर्वच नगरसेवकांनी केला आहे.  

प्रभाग क्रमांक २६ मध्ये येणाऱ्या दामूनगरच्या परिसराला अनेक समस्यांनी वेढले आहे. नाल्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे.

नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. शौचालयांचाही अभाव आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेविकेवर नागरिक नाराज आहेत. पोयसरमधील नगरसेविका सुनीता यादव आपल्या मतदारसंघातील बरीच कामे झाल्याचा दावा करीत आहेत; मात्र पोईसरमधील अस्वच्छता, शौचालयांची कमतरता आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात त्यांना यश आलेले नाही. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील सर्वच प्रभागांमध्ये अशा समस्या आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणावर प्रभागांमध्ये फेरबदल झाल्याने उमेदवारनिवडीचे मोठे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर आहे. याआधी या मतदारसंघात सहा प्रभाग होते. आता त्यांची संख्या आठ झाली आहे.

पोयसर प्रभाग क्रमांक २२ चा बराचसा प्रभाग २३ व २४ मध्ये समाविष्ट करून पोयसरची एकगठ्ठा मते तयार झाली आहेत. प्रभाग क्रमांक २९ साठी हनुमाननगर पहाडी भाग, अशोकनगर कांदिवली रेल्वेस्थानकापर्यंतचा सलग भाग असल्याने त्याचा फायदा उमेदवारांना होऊ शकतो.

संभाजीनगरात काही प्रमाणात कामे झाल्याने येथील मते भाजपकडेच वळतील, अशी शक्‍यता आहे. विधानसभा क्षेत्रात आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या विकासकामांचा फायदा भाजपला होऊ शकतो. नॅशनल पार्क हाय-वेचा यू टर्न, मैदानांचे सुशोभीकरण, रखडलेल्या एसआरएची मार्गी लागलेली कामे आदींचा विचार करता भाजपचे वर्चस्व राहण्याची शक्‍यता आहे. अशोकनगर, ठाकूर कॉम्प्लेक्‍स, पोयसर विभागात भाजपचा प्रभाव आहे. मालाड गोविंदनगर परिसरातही भाजपचे वर्चस्व आहे. 

प्रभाग २४ मध्ये समतानगर, दत्तानी पार्क व महेंद्र ॲण्ड महेंद्रचा भाग येतो. त्यामुळे २३ ते ३० अशा आठ प्रभागांमध्ये समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे नव्या प्रभागांमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार, याची चर्चा आहे. सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केली आहे.

प्रभागातील समस्या

  • वाहतूक कोंडी गंभीर
  • पोयसरमध्ये बेकायदा पार्किंगमुळे अडचण 
  • मालाडच्या दफ्तरी रोडला बेकायदा फेरीवाल्यांचा वेढा 
  • श्रीरामनगर ते आकुर्ली रोडची दुरवस्था 
  • प्रभागात अस्वच्छता 
  • पिण्याचे पाणी आणि शौचालयांचा अभाव
  • विकासकामांची संथगती 
Web Title: Slow development challenge to candidate