
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींविरोधात मॉडेल रिया चक्रवर्तीने केलेल्या आरोपांमधून सकृतदर्शनी गुन्हा घडला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे त्याचा तपास करण्याच्या हेतूने एफआयआर दाखल करणे कर्तव्य होते, असा खुलासा मुंबई पोलिसांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आला.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींविरोधात मॉडेल रिया चक्रवर्तीने केलेल्या आरोपांमधून सकृतदर्शनी गुन्हा घडला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे त्याचा तपास करण्याच्या हेतूने एफआयआर दाखल करणे कर्तव्य होते, असा खुलासा मुंबई पोलिसांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आला. यामुळे सुशांतच्या बहिणींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मितू सिंह आणि दिल्लीतील एका डॉक्टराच्या विरोधात रियाने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुशांतची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता त्याला बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे मानसिक तणावावरील बंदी घातलेली औषधे दिली, अशी तक्रार रियाने केली आहे. ही तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी सिंह बहिणींनी न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेत सोमवारी मुंबई पोलिसांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. रियाचे आरोप निव्वळ अंदाज आहेत. त्यामुळे त्यावर एफआयआर नोंदवून घेण्याची आवश्यकता नव्हती, असा दावा सीबीआयने केला आहे; मात्र तक्रारदाराने केलेल्या आरोपांची शहानिशा व्हायला हवी या हेतूने एफआयआर दाखल करणे पोलिसांचे काम होते. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा किंवा नियमांचे उल्लंघन करण्याचा हेतू नाही, असेही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.
बुधवारी पुढील सुनावणी होणार
सीबीआय तपासात हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसून जिवंत किंवा मृत व्यक्तींना बदनाम करण्याचा हेतू नाही. रियाच्या जबाबानुसार बोगस प्रिस्क्रिप्शन मागवून सुशांतला औषधे दिली असतील तर त्यामध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा असल्याची शक्यता आहे. त्याला मानसिक आजारासाठी तपासणी न करता ही औषधे दिल्यामुळे त्या दृष्टीनेही त्याच्या मृत्यूशी याचा संबंध आहे का, हे तपासायला हवे, असे म्हटले आहे. वांद्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निखिल कापसे यांनी प्रतिज्ञापत्र केले आहे. बुधवारी उच्च न्यायालयात न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी होणार आहे.
------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)