चाकरमान्यांच्या परतीसाठी ‘या’आगाराने केली खास व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

श्रीवर्धन आगारातून आगामी पाच दिवस जवळपास सहा हजार किमीची जादा वाहतूक नियमित करण्यात येणार आहे. जिल्हाबाह्य वाहतुकीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

अलिबाग : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी श्रीवर्धन आगार सज्ज झाले आहे. श्रीवर्धन तालुक्‍यातील बहुसंख्य लोक कामधंदा व नोकरीनिमित्त बोरिवली, नालासोपारा, विरार, ठाणे, भांडुप, मुंबई आणि उपनगरामध्ये वास्तव्य करून आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे.
 
श्रीवर्धन आगारातून आगामी पाच दिवस जवळपास सहा हजार किमीची जादा वाहतूक नियमित करण्यात येणार आहे. जिल्हाबाह्य वाहतुकीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पुणे 5.00, सातारा 5.45, नालासोपारा (7.00 व 13.00), बोरिवली 8.30 व 11.00, मुंबई 4.00, 5.00, 8.00, 11.45 तसेच दिघीवरून 4.00, 20.00 या नियमित फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील गावगाडा पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातून तोरडी वस्ती, माणगाव वस्ती, कुडा वस्ती, नानवेल वस्ती, दिघी वस्ती या रात्रवस्तीच्या बस सुरू केल्याचे आगारप्रमुख तेजस गायकवाड यांनी सांगितले.

पाया पडायला आला आणि कोरोना देऊन गेला

श्रीवर्धन आगारातील वाहतूक निरीक्षक शर्वरी लांजेकर, वाहतूक नियंत्रक दीपक जाधव, कार्यशाळाप्रमुख प्रदीप विचारे यांनी जादा वाहतुकीसाठी धोरणात्मक भूमिका घेत जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक करण्याच्या दृष्टिकोनातून बसचे वेळापत्रक तयार केले आहे. प्रवाशांच्या माहितीसाठी बोर्लीपंचतन, म्हसळा व श्रीवर्धन या सर्व ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्षाची सुयोग्य मांडणी करण्यात आली आहे. श्रीवर्धन आगारातील शहरी व ग्रामीण वाहतूक सेवा पूर्ववत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

गौरी गणपती सण व त्यासोबत पूर्वीचे नियते पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जनतेला माफक दरात प्रवासी वाहतूक देण्यासाठी एसटी प्रशासन कटिबद्ध आहे. ज्या मार्गावर ती प्रवासी असतील त्या मार्गाला प्राधान्यक्रम दिला जाईल. जनतेने सहकार्य करावे. 
- तेजस गायकवाड, 
आगारप्रमुख, श्रीवर्धन 

प्रवाशांसाठी बोर्लीपंचतन वाहतूक नियंत्रण कक्षात मॅन्युअली पद्धतीने तिकीट विक्री सुरू आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त प्रवाशांना उत्तम व दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन सज्ज आहे. 
- रवींद्र मोरे, 
वाहतूक नियंत्रक, बोर्लीपंचतन

(संपादन- बापू सावंत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special facility for employees from ST