विकास आराखड्यासाठी आज पालिकेत विशेष सभा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

नवी मुंबई महापालिकेने शहराचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्याबाबत लोकप्रतिनिधींची मते जाणून घेत, सूचना व चर्चा करण्याच्या अनुषंगाने आज (ता.३०) सकाळी ११ वाजता पालिकेकडून विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहराचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्याबाबत लोकप्रतिनिधींची मते जाणून घेत, सूचना व चर्चा करण्याच्या अनुषंगाने आज (ता.३०) सकाळी ११ वाजता पालिकेकडून विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीडी-बेलापूर येथील मुख्यालयातील राजमाता जिजाऊ सभागृहात ही विशेष महासभा होणार आहे.

शहराचा नियोजनबद्ध विकास तयार करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या निर्देशांनुसार, महाराष्ट्र महापालिका अधिनियमनाच्या अनुसूचीच्या प्रकरण २ मधील नियम-१ (क), (ड), (ह) अन्वये महापौर जयवंत सुतार यांच्या निर्देशानुसार ही विशेष सभा होणार आहे. नवी मुंबई महापालिकेत २००७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या अडवली-भुतवली अशा ३० महसुली गावांचा उक्त अंतिम विकास योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्या विषयावरही या सभेत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोने नवी मुंबई शहर विकसित करताना निश्‍चित केलेली नियोजन प्रमाणके, शहर अभियंता विभागाकडून प्राप्त विविध सार्वजनिक आरक्षणे व रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव, पालिकेच्या विविध विभागांच्या सूचना व मागण्या यावर सभागृहात चर्चा केली जाणार आहे. प्रारुप विकास योजनेचे नकाशे, अहवाल व प्रारुप विकास नियंत्रण व प्रोत्साहन पत्रके या विशेष बैठकीत दाखल करण्यात येणार असून, त्यावर चर्चा झाल्यानंतर हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावावर नवी मुंबईतील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांच्या सूचना व हरकतीही मागविण्यात येणार असून, त्यानंतर महासभेचा प्रस्ताव, जनमत अहवाल, नियोजनाचा आराखडा हा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शहर विकास आराखडा हा शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. महासभेत हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर चर्चा होईल. त्यानंतर प्रशासकीय सोपस्कर पार पडेल. शहर विकास आराखड्यामुळे नवी मुंबई शहराचा अधिक गतिमान व नियोजन पद्धतीने विकास होईल.
- जयवंत सुतार, महापौर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special meeting in the municipality today for the development plan