Special Reports | राज्यात नऊ हजारांवर क्षयरोगी; ठाणे, पुणे, अहमदनगरमध्ये सर्वाधिक रुग्ण 

Special Reports | राज्यात नऊ हजारांवर क्षयरोगी; ठाणे, पुणे, अहमदनगरमध्ये सर्वाधिक रुग्ण 

मुंबई : राज्यात महिनाभरात क्षयरोगाबाबत राबविलेल्या मोहिमेत जवळपास 9206 नवीन रुग्ण सापडले आहेत. ठाणे (988), पुणे (647) आणि अहमदनगर (539)मध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. राज्य सरकारने कुष्ठरोग आणि क्षयरोगाच्या आजाराचे निदान करण्यासाठी 1 डिसेंबरपासून घरोघरी स्क्रीनिंगला सुरुवात केली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील 8.66 कोटी आणि शहरी महानगरपालिकांमधील 1.84 कोटी लोकसंख्या तपासण्याचे लक्ष्य होते. 
आशा किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने दररोज ग्रामीण भागातील 20 आणि शहरी भागातील 25 कुटुंबांची भेट घेतली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी संशयित रुग्णांकडून दोन थुंकीचे नमुने गोळा केले, तर काही रुग्णांना छातीचे एक्‍स-रे काढण्यास सांगितले. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये आणि उच्च-जोखमीच्या भागातील 49.88 लाख लोकांची तपासणी केली. त्यात सतत खोकला आणि वजन कमी असलेले 9619 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 499 चाचणीनंतर क्षयरुग्ण पॉझिटिव्ह आले. 

महानगरपालिकेच्या क्षयरोग प्रभारी डॉ. प्रणिता टिपरे यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, दर महिन्याला 4500 ते 5000 नवीन क्षयरुग्णांचे निदान केले जात होते. मार्च ते जूनमध्ये मुंबईत क्षयरुग्णांची नोंद कमी होत गेली. साथीमुळे लोक पुढे येऊन रुग्णालयात तपासणी करायला घाबरत आहेत. मार्चपूर्वी घरोघरी स्क्रीनिंगमध्ये फारच कमी लोकांची नोंद झाली होती; परंतु या वेळी 499 रुग्णांची नोंद झाली. ज्यामुळे सक्रिय प्रकरणे शोधण्यात आणि आतापर्यंत लपलेले रुग्ण शोधण्यास मदत होईल. लोकांना चाचणी करून घेण्यास अद्यापही भीती वाटते. गेल्या काही महिन्यांत 2500-3000 रुग्णांचे निदान झाले आहे. मार्च ते जुलै या कालावधीत 51,884 रुग्ण सापडले होते, तर याच कालावधीत 2019 मध्ये 93,253 रुग्णांचे निदान झाले होते. त्यामुळे यंदा रुग्णांमध्ये 44 टक्के घट झाली. 


ठाण्यात सर्वाधिक नोंद 
डिसेंबरच्या मोहिमेत ठाण्यात 988 सर्वाधिक क्षयरुग्णांची नोंद झाली. त्यानंतर पुणे (647), अहमदनगर (539), मुंबई (499), जळगाव (461) सापडले. स्क्रीनिंग मोहिमेदरम्यान 14 जिल्ह्यांमध्ये 200 ते 600 रुग्ण नोंदले गेले. वाशिम, परभणी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. 

मुंबईत केवळ 499 रुग्ण 
मुंबईत 1 ते 29 डिसेंबरदरम्यान क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली गेली. या मोहिमेत 50 लाख 54 हजार 432 तपासणी करण्यात आल्या. यात फक्त 499 क्षयरुग्ण सापडल्याने मुंबई क्षयमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याची दिलासादायक बाब समोर आली. मुंबईतून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवल्या जातात. या मोहिमेचा एक भाग म्हणून 1 ते 29 डिसेंबरदरम्यान केलेल्या तपासणीत 499 व्यक्तींना क्षयरोग असल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णांवर पालिकेच्या अथवा राज्य सरकारच्या अखत्यारीतील रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 


क्षयरोगाची लक्षणे 

  • - 14 दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला 
  • - दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप असणे 
  • - सायंकाळी ताप येणे 
  • - वजनात लक्षणीय घट होणे 
  • - थुंकीमधून रक्‍त पडणे 
  • - छातीत दुखणे 
  • - मानेवर सूज असणे 

Special Reports Over nine thousand TB patients in the state Most patients in Thane, Pune, Ahmednagar

-------------------------------------------

( संपादन -तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com