अपंगांना एसटीतील सवलती बंद? राज्यात अनेक ठिकाणी अपंगांकडून पूर्ण तिकीट वसूली

प्रशांत कांबळे
Sunday, 30 August 2020

  • सवलत असूनही ज्येष्ठ,  अपंगांना एसटीचे पुर्ण तिकिट
  • राज्यात अऩेक ठिकाणी प्रकार;
  • वाहकांनाही नोटीसा  सवलत योजना बंद झाल्याचा अधिकाऱ्यांचा कांगावा

मुंबई : राज्यात 20 ऑगस्टपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी प्रवासासाठी ज्येष्ठ आणि अपंगांना सवलत न देताच त्यांच्याकडून पुर्ण तिकीटांची वसूली केली जात असल्याचे समोर आले आहे. 

पनवेल ते दादर प्रवास करणारे अपंग संदिप काशीद यांना लाॅकडाऊन काळात एकदाही अशी सवलत दिली गेली नाही. यासंदर्भात वाहकांना विचारणा केल्यावर प्रवासी सवलतीच्या योजनाच बंद झाल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली. काशिद 79 वर्षीय अपंग आहेत. तसे एसटीचे सवलत कार्डही त्यांच्याकडे आहे. प्रवासासाठी नियमानूसार त्यांना तिकिट दरात 75 टक्के सवलत आहे. मात्र, कोरोना काळात पुर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बदलापूरात मोठा अनर्थ टळला; MIDCतील एकापाठोपाठ दोन कंपन्यांना मोठी आग

अमरावती विभागात तर चक्क अमरावती आगार व्यवस्थापकांनीच वाहकाला याप्रकरणी नोटीस बजावल्याचा प्रकार घडला आहे. एसटीच्या वाहकाने दोन ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या योजनेचा लाभ देऊन त्यांची तिकीट दिली. मात्र, त्यानंतर कोरोना काळात ज्येष्ट नागरिक व 12 वर्षांखालील मुलांना मिळणाऱ्या प्रवास सवलतीच्या योजना बंद झाल्या आहेत. तिकीटीची शिल्लक रक्कम तात्काळ आगाराच्या रोकड शाखेत भरण्याची नोटीस एस. डी. गजभिये नावाच्या वाहकालाच चक्क आगार व्यवस्थापकांनी बजावली. मात्र, अमरावती विभाग नियंत्रकांच्या ही चुक लक्षात आल्यानंतर त्यांनी अमरावती आगार व्यवस्थापकाला पत्र पाठवून सवलत योजना सुरू असल्याचे सांगून नोटीसीबाबत खुलासा मागितला आहे.

 

 

दादरला गारमेंन्टच्या दुकानात काम करतो. त्यासाठी पनवेल ते दादर नेहमी एसटीने प्रवास करतो. 79 टक्के अपंग असल्याने मला एसटीच्या प्रवासामध्ये 75 टक्के सवलत आहे. मात्र, या कोरोना काळामध्ये 100 टक्के तिकीट वसूल केली जात आहे. अशा तिकीट सवलती बंद झाल्याचे वाहक सागंत आहे. 
- संदिप काशीद,
अपंग, पनवेल

 

सवलतीच्या योजना सुरू आहेत. राज्य शासन किंवा एसटी महामंडळाने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यात काही ठिकाणी गैरसमजूतीतून योजना बंद झाल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, त्यावर वेळीच कारवाई करण्यात आली आहे. 
- राहूल तोरो,
महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

-----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST concessions for the disabled closed? Full ticket collection from disabled people at several places in the state