"सिटी सेंटर मॉलमधील काही मजले अनधिकृत, अग्निप्रतिबंधक यंत्रणाही काम करत नव्हती"; स्थायी समितीत आरोप

समीर सुर्वे
Thursday, 29 October 2020

स्थायी समितीच्या बैठकिला पालिकेच्या प्रमुख विभागाचे विभाग प्रमुख उपस्थितीत असतात. मात्र आज प्रमुख अग्निशमन अधिकारी उपस्थित नव्हते

मुंबई, ता. 29 : नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलचे काही मजले बेकायदा असून मॉलमधिल अग्निप्रतिबंधक यंत्रणाही काम करत नव्हती असा आरोप आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकित करण्यात आला. तसेच तब्बल 20 तासांपर्यंत या इमारतीचा आराखडाही अग्निशमन दलाला मिळू शकला नाही अशीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या चौकशीचा अहवालही स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आज स्थायी समितीच्या बैठकित सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीचा मुद्दा उपस्थीत केला. याप्रकरणी चौकशीची मागणी करत बेकायदा बांधकामाचीही मुद्दा त्यांनी मांडला. तसेच इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणाही काम करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी त्याला पाठिंबा दिला. 2018 मध्ये कमला मिल कंपाऊड दुर्घटनेनंतरही पालिकेने धडा घेतला नाही. त्यावेळी घेतलेले सर्व निर्णय कागदावरच राहीले असून 20 तास या इमारतीचा आराखडाही अग्निशमन दलाला मिळू शकला नाही. अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे आग 60 तास धुमसत राहीली असून अजूनही या इमारतीतून दुर्घंधीही येत आहे.असा आरोप शेख यांनी केला.

महत्त्वाची बातमी : रहिवाशांना दिलासा, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना 1 वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खातं उघडणे बंधनकारक

स्थायी समितीच्या बैठकिला पालिकेच्या प्रमुख विभागाचे विभाग प्रमुख उपस्थितीत असतात. मात्र आज प्रमुख अग्निशमन अधिकारी उपस्थित नव्हते.

कॉग्रेसचे सदस्य जावेद जूनेजा यांनी या मॉलमधिल चायनिज वस्तूंचा मुद्दा उपस्थित करत चायनिज वस्तूचा साठा करण्यावर मर्यादा ठेवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. या मुद्द्यांची दखल घेऊन या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच या मॉल मधले काही मजले बेकायदा असण्याची शक्यता आहे. त्याबाबतही माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

( संपादन - सुमित बागुल )

standing committee meeting opposition alleged that few floors of city center malls are unauthorize


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: standing committee meeting opposition alleged that few floors of city center malls are unauthorized