मध्य रेल्वे मार्गावरही महिला प्रवाशांसाठी विशेष लोकल सुरु करा, महिला प्रवाशांची मागणी

शर्मिला वाळुंज
Sunday, 27 September 2020

मध्य रेल्वे प्रशासनानेही या निर्णयाचा विलंब न लावता लवकरात लवकर निर्णय घेत मध्य रेल्वे मार्गावरील महिलाप्रवाशांनाही दिलासा द्यावा अशी मागणी आता महिलावर्गातून जोर धरु लागली आहे.

मुंबईः  पश्चिम रेल्वेने महिला प्रवाशांसाठी लेडीज स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेत त्यांना दिलासा दिला. मध्य रेल्वे प्रशासनानेही या निर्णयाचा विलंब न लावता लवकरात लवकर निर्णय घेत मध्य रेल्वे मार्गावरील महिलाप्रवाशांनाही दिलासा द्यावा अशी मागणी आता महिलावर्गातून जोर धरु लागली आहे. या मागणीचा विचार वरीष्ठ पातळीवर मांडून चाचणी करुन नंतर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मध्य रेल्वे प्रवाशसाने उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाला दिले आहे. असे असले तरी निर्णय प्रक्रियेस विलंब लावू नये, मध्य रेल्वे प्रशासन कायम उशीरा जागे होते असे मत महिला प्रवाशांनी मांडले. 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी कर्मचारी तसेच खासगी बॅंकेतील दहा टक्के कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली. फेऱ्यांमध्ये वाढ झाली असली तरी महिला प्रवाशांसाठी लोकलच्या डब्यांची संख्या कमी असल्याने महिलांच्या डब्ब्यात गर्दी उसळत होती. कोरोना संकट काळात सोशल डिस्टसिंगचे पालन या गर्दीत करायचे कसे हा संदेश देत हे गर्दीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल झाले. याचा विचार करीत पश्चिम रेल्वे प्रशासनाने सकाळ आणि संध्याकाळ लेडीज स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला असून सोमवार पासून या लोकल चालविल्या जाणार आहेत. 

पश्चिम रेल्वे प्रशासनाप्रमाणेच मध्य रेल्वे प्रशासनानेही महिला प्रवाशांची लोकल डब्यात होणारी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे मार्गावर लेडीज स्पेशल ट्रेन सुरु करावी अशी मागणी महिला वर्गातून जोर धरत होती. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांची भेट याविषयी चर्चाही केली. वरीष्ठ पातळीवर हा विचार मांडून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी महिला वर्गाला दिले. असे असले तरी आश्वासनावर आमचा विश्वास नाही, रेल्वे प्रशासनाने निर्णय घेण्यास विलंब करु नये अशी मागणी महिला प्रवासी करीत आहेत. 

  • आश्वासनांवर आमचा विश्वास नाही. नेहमीच पश्चिम रेल्वेला विशेष आणि प्रथम प्राधान्य दिले जाते. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूकीचे कायम तीनतेरा वाजलेले असतात. पश्चिम रेल्वे मार्गावर महिला विशेष लोकल सुरु होते, तर मध्य रेल्वे प्रशासनाला अजून कसला अभ्यास करायचा आहे. 

प्राची निमसे, प्रवासी कल्याण

  • सध्याच्या घडीला लोकलच्या फेऱ्यांची संख्या कमीच पडत आहे. त्यात महिलांसाठी तीन डब्बे असल्याने सकाळ संध्याकाळ कामाच्या वेळेत लोकलला गर्दी असतेच. या गर्दीत कोरोना होणार नाही याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. महिलांसाठी विशेष लोकल, तसेच लोकलच्या फेऱ्यांची संख्याही आणखी वाढविण्याची आवश्यकता वाटते. 

आरती खामकर, प्रवासी डोंबिवली 

  • लोकलची गर्दी पाहून रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडावा वाटतो, परंतू खर्ची होणारा वेळ, रस्त्यांची दुरावस्था त्यामुळे बसमध्ये आदळून होणारे हाल नकोसे वाटतात. त्यामुळे लोकलच बरी पडते, परंतू गर्दीत कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती जास्त वाटते. सोशल डिस्टसिंग सोडा परंतू किमान चेंगराचेंगरी न होता प्रवासी प्रवास करतील असे नियोजन करीत लोकल फेऱ्या चालविल्या पाहीजेत. 

काजल पाखरे, प्रवासी ठाणे

------------

(संपादनः पूजा विचारे) 

Start special ladies local Central Railway route demand women passengers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start special ladies local Central Railway route demand women passengers