
राज्याची झेप एक ट्रिलियन डॉलरच्या दिशेने
मुंबई - कोविड काळ असूनही राज्याने प्रगती आणि विकासात कुठेही खंड पडू दिला नाही. महाराष्ट्राने देशातील एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी विकासाची पंचसूत्री ठरवली आहे, असा विश्वास व्यक्त करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र दिनी राज्य सरकारवर स्तुतिसुमने उधळली. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित समारंभात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कोश्यारी म्हणाले, कोरोनाच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रीतीने सामना करत असताना महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केले. राज्यातल्या ९२ टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ लोकसंख्येला लशीचा किमान एक डोस दिला असून उर्वरित लसीकरण गतीने पूर्ण होत आहे.
नीती आयोगाने जाहीर केलेल्या ‘एक्स्पोर्ट प्रिपेर्डनेस इंडेक्स’मध्ये महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्र शासनाच्या ‘सुशासन निर्देशांक अहवाल २०२१’मध्ये महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळवले, असेही त्यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
ईव्ही धोरण सर्वसमावेशक!
इलेक्ट्रिक वाहनांबाबत राज्य शासनाने तयार केलेले धोरण व्यापक आणि सर्वांगीण असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरिकांना तसेच गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
कोश्यारी म्हणाले
स्वतंत्र कृषी निर्यात धोरणांतर्गत २१ पिकांसाठी क्लस्टरनिहाय फॅसिलिटेशन सेल
दिल्ली-मुंबई कॉरीडॉरलगत रायगड जिल्ह्यात दोन हजार ५०० एकर बल्क ड्रग पार्क
औरंगाबादनजीक बिडकीन येथील ऑरीक स्मार्ट सिटीमध्ये ३५० एकर क्षेत्रावर वैद्यकीय उपकरण पार्क
मुंबईत मेट्रोच्या विविध १४ प्रकल्पांचे काम वेगाने सुरू; बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प प्रगतिपथावर
Web Title: State Leaps Towards A Trillion Dollars
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..