कोट्यवधींच्या खर्चासह खेळण्यांचा चुराडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

वसईत उद्यानांतील सुशोभीकरण वाया; व्यायामाच्या साधनांची मोडतोड

वसई ः वसई-विरार महापालिकेने उद्यान सुशोभित करताना लहान मुलांसाठी खेळणी, नागरिकांना व्यायामासाठी खुली व्यायामशाळा सुरू केली; मात्र कोट्यवधी रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या या साधनांची अवस्था बिकट असून याचा नागरिकांना लाभ घेता येत नाही, तर बसवण्यात आलेल्या साधनांच्या ठिकाणीच पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरल्याने तेथे पोहोचणेही कठीण जात आहे.

नागरिकांना सुविधा मिळावी म्हणून उद्यानात झाडे लावणे, सुशोभीकरण करणे; तसेच लहान मुलांसाठी घसरगुंडी, झुले यासह विविध प्रकारची खेळणी लावण्यात आली. यामुळे लहान मुलांना ताजेतवाने वातावरण अनुभवता यावे; तर ज्येष्ठ नागरिकांसह अपंग, अन्य नागरिकांना स्वच्छंदी वातावरणात व्यायाम करता यावा, म्हणून हा सर्व खटाटोप करण्यात आला आहे.

क्रॉस अँड झिरो, ऑर्बिटर क्‍लाम्बर, व्हर्टिकल शोल्डर, ब्रिज लॅण्डर यासह अन्य साधने लावली जात आहेत. महागड्या व्यायामशाळेत जाणे ज्यांना शक्‍य नाही ते पालिकेच्या उद्यानात मोफत व्यायामाची उपकरणे असल्याने याचा लाभ घेतात. 
अपंग  व्यक्तींनादेखील यामुळे मदत होते.

पाच वर्षांत एकूण २६ करोड ४५ लाख खर्च करून उभारण्यात आलेल्या उद्यानातील साधने मोडकळीस आली असून पावसाच्या पाण्यामुळे चिखल निर्माण झाला असल्याने व्यायाम व खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. पालिकेने नागरिकांसाठी योजना आणल्या; मात्र त्याची देखभाल करण्यात यश येत असल्याचे दिसत आहे.

येथील व्यायामसाधने नादुरुस्त
वसई एव्हरशाईन, महेश पार्क, पापडी, सेंट्रल पार्क, रानपाडा, आचोळे, मोरेगाव, श्रीप्रस्थ, मनवेलपाडा, वालीव, बोळिंज, धानीवबाग, मनवेल पाडा यासह अन्य काही उद्यानांत व्यायाम व खेळणी, साधने नादुरुस्त झाली आहेत. पावसामुळे उद्यानाची अवस्था बिकट झाली आहे.

व्यायाम आणि खेळणी नादुरुस्त असणाऱ्या उद्यानांची पाहणी करण्याच्या सूचना  प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे उद्यानातील नादुरुस्त साधने लवकरच बदलली जातील. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.
राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steal toys with the cost of billions Wasted gardens in the Vasai, near Palghar