विमानतळ प्रकल्पग्रस्तांवर लाठीचार्ज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

काम बंद पाडण्याचा प्रयत्न; अटकेनंतर आंदोलकांची सुटका

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित वाघिवली गावातील ग्रामस्थांनी मंगळवारी (ता.४) विमानतळाचे काम बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एनआरआय पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यावेळी पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक करून रात्री उशिरा सोडून दिले.

ही बातमी वाचली का... जेव्हा कुणाल कामरा थेट राज ठाकरेंना उघडपणे देतो लाच...

वाघिवली गाव हे मच्छिमारांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील मच्छिमारांचे योग्य पूनर्वसन होण्यासाठी ग्रामस्थांनी सिडकोविरोधात २३ डिसेंबरपासून ३९ दिवस महामुक्काम आंदोलन केले होते. यावेळी सिडको प्रशासनाने प्रकल्पबाधितांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. मात्र चर्चा न करताच गावाशेजारील विमानतळाचे काम सुरूच ठेवले होते. प्रजासत्ताक दिनी देखील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत योग्य पुनर्वसन न झाल्यास सिडको प्रशासनाविरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठराव केला होता. सिडकोकडून निव्वळ आश्वासनांची खैरात मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. त्यातच सिडको प्रशासनामार्फत मंगळवारी सकाळी गावात येणारा रस्ता भराव करून बंद करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन करत हे काम बंद पाडले. आंदोलनात २५० महिला व १०० अधिक पुरुष सहभागी झाले होते.

महत्वाची बातमी ...आणि समोरून धडधडत आला मृत्यू, बातमी वाचाल तर डोळ्यातून पाणी येईल

वाघिवली गावात येणारा रस्ता बंद करण्यात येत होता. आम्ही विचारल्यानंतर तुम्हाला पर्यायी रस्ता देऊ असे सांगितले. पण पर्यायी रस्ता कधी देणार? गेले कित्येक महिने आम्ही केवळ अश्वासनेच ऐकत आहोत. सिडको प्रशासनाने अजून आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. आम्ही विश्वास कसा ठेवायचा? दुपारी अडीचच्या सुमारास आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिसांनी २ महिलांवर आणि काही पुरुषांवर लाठीचार्ज केला. मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.
- पंकज मुंडकर
, उपसरपंच, वाघिवली

Sticks charged at airport project victims


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sticks charged at airport project victims