पोलादपुरातील ग्रामीण भागात मातीच्या चुलीचाच वापर

देवेंद्र दरेकर : सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 November 2019

आजही पोलादपुरात बहुतांश घरात मातीच्या चुलीचा वापर केला जात आहेत.

पोलादपूर : सर्वत्र एकसमान परिस्थिती असली की ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही म्हण वापरण्याची पद्धत आपल्याकडे आहे. परंतु, बदलत्या काळातही मातीच्या चुली येथे घरोघरी पाहावयास मिळत आहेत. आजही पोलादपुरात बहुतांश घरात मातीच्या चुलीचा वापर केला जात आहेत. आधुनिकता कितीही आली, तरी ग्रामीण भागापर्यंत लवकर पोहचत नाही, हे यातून दिसून येते.

एकेकाळी सकाळी उठल्यावर गृहिणीचे पहिले काम असायचे ते चुलीतल्या आदल्या दिवशीची राख बाहेर काढण्याचे आणि नवी आग साकटण्याचे. बाहेर काढलेली राख नळयामध्ये घेऊन राखेसाठी असलेल्या ‘कोंडल्यात’ टाकली जायची. काही वर्षांपूर्वी चूल हा घरातला एक महत्त्वाचा घटक होता; मात्र आज चुली दुर्मिळ असल्या तरी पोलादपूरसह इतर ठिकाणी वापरात आहेत. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना ग्रामीण भागाचा विकास होणे क्रमप्राप्त आहे आणि प्रदूषणमुक्त वाडी वस्ती करणे क्रमप्राप्त बनले आहे. 

मातीचा आकार देऊन मातीच्या विविध वस्तू करणारा कुंभार व्यावसायिक विविध अडचणींना सामोरा जात असला, तरी अडचणींवर मात करत आपल्या उदरनिर्वाहासाठी मातीच्या चुलीसह मडकी घडवत आहेत. आजही ग्रामीण भागात सौरगॅस, बायोगॅस यांसह विविध उपक्रमही असले, तरी काही ग्रामस्थांकडे मातीच्या चुलीलाच प्राधान्य दिले जात आहे. अंगणाच्या बाहेर या चुली उभारलेल्या पाहायला मिळत आहेत.

प्रगतशील महासत्तेकडे वाटचाल करत असताना प्रदूषणमुक्त वाडी वस्ती होणे क्रमप्राप्त बनले आहे. मात्र, आजही ग्रामीण वाडी वस्तीकडे जाण्यास रस्ते व मार्ग नसल्याने या ठिकाणी सिलेंडर व गॅस पोहोचणे शक्‍य नाही. शिवाय, गॅस सिलेंडरसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करता येत नसल्याने आणि पैशाच्या कमतरतेमुळे आजही मातीच्या चुली पोलादपुरात अनेक घरात वापरात आहेत.  चुलीच्या जेवणाला वेगळीच चव जाणवते, जी आजकाल दुर्मिळ होत चालली आहे. मध्यंतरी काळात मातीच्या चुलीची जागा सिमेंटच्या चुलीने घेतली होती; मात्र या चुली उचलण्यास जड व आगीच्या ज्वालाने गरम होत असल्याने ग्रामीण भागासह पोलादपूर मातीच्या चुलींनाच प्राधान्य दिले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Still Mud Stove use in Poladpur Rural Area