पश्चिम रेल्वेचा महिला लोकल डब्यावर दगडफेक; थोड्यात महिला पत्रकार बचावली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pratiksha Bansode

रविवारी पश्चिम रेल्वेचा माहीम-वांद्रे स्थानकादरम्यान महिला लोकल डब्यावर दगडफेक केल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे.

पश्चिम रेल्वेचा महिला लोकल डब्यावर दगडफेक; थोड्यात महिला पत्रकार बचावली!

मुंबई - मध्य रेल्वेचा कळवा-मुब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान काही दिवसांपूर्वी धावत्या लोकलवर दगड फेकल्याची घटना ताजी असताना, रविवारी पश्चिम रेल्वेचा माहीम-वांद्रे स्थानकादरम्यान महिला लोकल डब्यावर दगडफेक केल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिला पत्रकाराला डोकाला दगड लागला असून सुदैवाने मोठी इजा झाली नाही.

मिळाल्या माहितीनुसार, मुंबईतील एक वृत्तवाहिनीतील महिला पत्रकार प्रतीक्षा बनसोडे ही रविवारी ऑफिसवरून घरी जात होती. दादर रेल्वे स्थानकावरून ७.२८ ची बोरिवली जलद लोकल पकडली. या लोकलचा महिला डब्यातून प्रतीक्षा प्रवास करत होती. यादरम्यान लोकल माहीम ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असताना महिला डब्याला टारगेट करत काही अज्ञान समाजकंटकांनी दगडफेक केली. यातील एक दगड प्रतीक्षा बनसोडे हिच्या डोक्याला लागला.

मात्र, सुदैवाने मोठी इजा झाली नाही. प्रतीक्षाने यासंदर्भातील तक्रार ट्विटर अकाऊंटवरून रेल्वेला केली आहे. या संदर्भात पश्चिम रेल्वेचा विभागीय सुरक्षा आयुक्तांना विचारणा केली असता त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालेला नाही.

रेल्वे रुळाशेजारी असणाऱ्या झोपडपट्टी भागातून दगडफेकीच्या घटना घडतात. यापूर्वीही हार्बर रेल्वमार्गावर कुर्ला ते टिळकनगर, कळवा- मुब्रा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलवर दगडफेकीचा घटना घडल्या होता. त्यानंतर या स्थानकांदरम्यान आरपीएफ पोलिसांची गस्त वाढविण्यात आली होती. मात्र, आता पश्चिम रेल्वेवर सुद्धा दगडफेकीचा घटना घडल्याने पश्चिम रेल्वे काय उपाय करते हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.

या घटनेसंदर्भात पश्चिम रेल्वे आणि आरपीएफ पोलिसाना ट्विटरवरून मी तक्रार केली आहे. मंगळवारी सकाळी मी आरपीएफ पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार करणार आहे. महिला डब्यावर दगडफेकण्याचा प्रकार अत्यंत्य गँभीर आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते.

- प्रतीक्षा बनसोडे, महिला पत्रकार