तीस हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे केंद्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांसाठी महाविद्यालये ताब्यात घेतल्यामुळे तब्बल 40 हजार विद्यार्थ्यांना सीईटी सेलकडून दुसऱ्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळणार होते. या विद्यार्थ्यांना घराजवळ परीक्षा केंद्र मिळावे, यासाठी सीईटी सेलने आपत्कालीन योजना आखली.

मुंबई - निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांसाठी महाविद्यालये ताब्यात घेतल्यामुळे तब्बल 40 हजार विद्यार्थ्यांना सीईटी सेलकडून दुसऱ्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळणार होते. या विद्यार्थ्यांना घराजवळ परीक्षा केंद्र मिळावे, यासाठी सीईटी सेलने आपत्कालीन योजना आखली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने काही महाविद्यालये परीक्षा केंद्रांसाठी उपलब्ध झाल्यामुळे तब्बल 30 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळणार आहे. उर्वरित 10 हजार विद्यार्थ्यांचे नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) 2 ते 13 मे या कालावधीत सीईटी परीक्षा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने 30 हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय परीक्षा केंद्र दिले जाणार असल्याने दिलासा मिळाला आहे. उर्वरित 10 हजार विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.

Web Title: Student Exam Center