अनुपम खेर यांच्याकडून कृषी विधेयकाचं समर्थन; आपल्या चित्रपटातील व्हिडिओ केला शेअर

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 21 September 2020

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबई- राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळात रविवारी कृषी विधेयक मंजूर झाले.  या विधेयकावरुन देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी या विधेयकाचे समर्थन केले आहे, तर काहींनी याला विरोध केला आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा होईल आणि ते आत्मनिर्भर बनतील.

चिनी सीमेजवळ राफेल विमानांच्या घिरट्या; ड्रॅगनला भरणार धडकी

अनुपम खेर यांनी अनेकवेळा मोदी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले आहे. यावेळीही त्यांनी ट्विट करुन मोदी सरकारचं समर्थन केलंय. खेर यांनी त्यांच्या 'जीने दो' चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ते म्हणालेत की, 1990 मध्ये माझा 'जीने दो' नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटात मी एका गरीब शेतकऱ्याची भूमिका केली होती, जो शेतातील आपले धान्य बाजारात विकायला घेऊन येतो. यात आमरिश पुरी यांनी एका जमीनदाराची भूमिका केली असून ते आपल्या मर्जीनुसार याची किंमत लावतात. जेव्हा तो शेतकरी धान्याच्या दुकानात जातो तेव्हा त्याला कळतं की, जे धान्य 150 रुपयांना विकले होते ते आता 250 ला मिळत आहे. 

अनुपम खेर यांनी गेल्या 70 वर्षात शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाल्याचं म्हटलं आहे. पण नवीन विधेयक आल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्थितीत मोठी सुधारणा होईल. शेतकरी आता मालक बनेल. शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनले पाहिजे, असं खेर म्हणाले. 

अमेरिकी नौदल तळावर बॉम्ब हल्ला? चीनने शेअर केला व्हिडिओ

दरम्यान,  कृषी विधेयकावरून राज्यसभेत रविरावी अभूतपूर्व गोंधळ झाला. यावेळी काही खासदारांकडून नियमावली पुस्तिका फाडण्यात आलं तसंच उपसभापतींचा माईकसुद्धा तोडण्यात आला. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर आठवड्याभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एकूण आठ खासदारांवर ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, राजु सातव, केके राजेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नाझिर हुसैन, इम्रान करिम यांचा समावेश आहे. राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support Agriculture Bill by Anupam Kher Shared a video from his movie