राबणाऱ्या हातांचा पूरग्रस्त नागरिकांना आधार 

मदत सुपूर्द करताना सरलाबाई काळे.
मदत सुपूर्द करताना सरलाबाई काळे.

बदलापूर : स्वतःच्या घरात एकावेळी पन्नास किलो तांदूळ कधी भरले नाहीत; मात्र कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी पन्नास किलो तांदूळ तर दिलेच; त्यासोबत पाकिटात उरलेल्या शंभर रुपयांमधून तेलाचे पाकीटसुद्धा आणून दिले. घरकाम करून आपला संसार चालवणाऱ्या सरलाबाई काळे यांच्या या दातृत्वामुळे त्या बदलापूरमध्ये कौतुकाच्या विषय ठरल्या आहेत. 

गुरुवारी आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या पूरग्रस्तांच्या मदत फेरीत सरलाबाई यांनी ही मदत दिली. या मदतफेरीमुळे माणुसकीच्या संस्कृतीचे दर्शन घडल्याची भावना आमदार कथोरे यांनी व्यक्त केली.          

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले असून, बदलापूरमध्येही मदतीचा प्रचंड ओघ आहे. या वेळी कुळगाव बदलापूर इलेक्‍ट्रिक हार्डवेअर व पेंट्‌स असोसिएशन या संघटनेने हजार किलो तांदूळ, तीनशे किलो तूरडाळ आणि तीनशे किलो गव्हाचे पीठ इतका माल काही मिनिटांमध्ये जमा करून दिला. आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांसाठी आयोजित केलेल्या मदतफेरीत पहिल्याच दिवशी ३ लाख रुपयांची मदत जमा झाली असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी दिली.   

मदतफेरी निघाल्याचे सरलाबाई काळे यांनी पाहिले. त्यांच्या पाकिटात पंधराशे रुपये होते. मदतफेरी ज्या दुकानाजवळ उभी होती, तेथील दुकानात सरलाबाई गेल्या आणि दीड हजार रुपयांचे पन्नास किलो तांदूळ घेतले. त्यातील शंभर रुपये शिल्लक राहिल्यावर सरलाबाई यांनी त्या शंभर रुपयांचेही तेल घेऊन दिले. सरलाताईंच्या या दातृत्वाला उपस्थितांनी सलाम केला. ही फेरी थोडी पुढे सरकताच एक आजी आमदारांजवळ येत त्या पूरग्रस्तांना माझ्याकडून या राख्या द्या, असे सांगितले. 

माझे उत्पन्न कमी असले तरीही कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांचे सध्या मोठे हाल होत आहेत. त्यांच्यासाठी जितके करणे शक्‍य आहे तितके करण्याचा मी प्रयत्न केला. स्वतःपेक्षा या सर्व पूरग्रस्त कुटुंबांना मदतीची अधिक गरज आहे.
- सरलाबाई काळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com