"आरे'तील वृक्षतोडीला कडाडून विरोध - सुप्रिया सुळे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

‘आरे’चे जंगल हे मुंबईचे फुफ्फुस आहे. शहराला शुद्ध हवा ‘आरे’च्या वनामुळेच मिळते. त्यामुळे विकासाच्या नावाखाली येथील बेसुमार वृक्षतोड चुकीची असून, याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडाडून विरोध करणार आहे,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी काल येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सांगितले.

मुंबई - ‘आरे’चे जंगल हे मुंबईचे फुफ्फुस आहे. शहराला शुद्ध हवा ‘आरे’च्या वनामुळेच मिळते. त्यामुळे विकासाच्या नावाखाली येथील बेसुमार वृक्षतोड चुकीची असून, याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडाडून विरोध करणार आहे,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी काल येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ‘आरे बचाव’ चळवळीच्या बाजूने असल्याचे सांगण्यासाठी सुळे यांनी आरे वसाहतीला आज भेट दिली.

आरे कॉलनीतील स्थानिक आदिवासींनी रविवारी मेट्रो तीनच्या प्रस्तावित कारशेडच्या जागी आंदोलन केले. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य कप्तान मलिक यांनी आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीला पाठिंबा दिल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला. मलिक यांनी वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या अमृता भट्टाचार्य यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘आरे’तील झाडांच्या कत्तलीला विरोध असल्याची भूमिका सुळे यांनी मांडली. मलिक यांच्याशी या मुद्द्यावर बोलू, असेही त्यांनी सांगितले. ‘आरे’तील झाडांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे आश्‍वासन सुप्रिया सुळे यांनी या वेळी दिले. आम्हा आदिवासींनाही मुख्यमंत्र्यांसमोर आमची व्यथा मांडू द्या, अशी विनंती या वेळी स्थानिक आदिवासी प्रकाश भोईर यांनी केली.

भरपावसात आंदोलन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आरे कॉलनीतील वृक्षतोडीला असलेला विरोध लक्षात घेत खासदार गजानन कीर्तिकर यांनीही आदिवासींची भेट घेतली. शिवसेना आरे कॉलनीतील रहिवाशांसोबत असल्याची भूमिका कीर्तिकर यांनी मांडली.  आज भरपावसातही मुंबईकरांनी एकत्र येऊन आरेतील वृक्षतोडीला विरोध दर्शविला. शेकडो मुंबईकरांनी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे आरेतील कारशेडला विरोध केला.

एमएमआरसीएलची झाडे टिकणार नाहीत
कारशेडसमोरील जागेत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) लावलेली झाडे स्थानिक नाहीत. दोन फुटांच्या अंतरावर एकामागून एक झाडे लावल्याने ही झाडे जगणार नाहीत, असा दावा स्थानिक आदिवासी प्रकाश भोईर यांनी केला. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आदिवासी येथील झाडांची कत्तल होऊ देणार नाही. झाडांची कत्तल झाल्यास आम्ही ‘चिपको आंदोलन’ छेडू, असा नारा आदिवासींनी या वेळी दिला.

‘आरे वाचवा’ मोहिमेला कलाकारांचा पाठिंबा
मुंबई - मेट्रो यार्डसाठी गोरेगाव येथील आरे कॉलनीतील २७०० हून अधिक झाडे तोडण्याच्या निर्णयाला बॉलीवूड कलाकारांनी विरोध दर्शवला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता 
इशान खट्टर यांनी रविवारी ‘आरे बचाव’ मोहिमेला उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. अभिनेता हृदयनाथ जाधव, नितीन जाधव हे  मराठी कलाकारही या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule will oppose the cutting of trees in the Aarey Colony