आमच्यामुळे वडिलांवर मुजरा करण्याची वेळ येणार नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

सुप्रिया सुळे यांचा पक्षबदलू नेत्यांना टोला

ठाणे : गेली ४० वर्षे एकाच पक्षाबरोबर निष्ठा ठेवल्यानंतर केवळ पुत्राच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी जुनेजाणते नेते नव्या पक्षात जाऊन नव्या नेत्यांना मुजरा करीत आहेत. आम्ही वंशाचा दिवा नसलो, तरी आमच्यावर स्वाभिमानाचे संस्कार झाले आहेत. आमच्यामुळे आमच्या वडिलांवर इतरांना मुजरा करण्याची वेळ कधीही येणार नाही. असा टोला दलबदलू नेत्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

संवाद दौऱ्यासाठी सुप्रिया सुळे ठाण्यात आलेल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी दलबदलू नेत्यांवर कडवट टीका केली. इतर पक्षांत जात असलेल्या काही नेत्यांवर राजकीय दबावही आणला जात आहे. या नेत्यांना त्यांच्यामागे बॅंक अथवा कारखाने घोटाळ्याची चौकशी लावण्याच्या धमक्‍या दिल्या जात आहेत; मात्र अशा वातावरणात चौकशीला घाबरून पक्ष सोडत असलेल्या नेत्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे गणेश नाईक अद्याप राष्ट्रवादीत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 

आज मुंबईत मोर्चा
मुख्यमंत्र्यांचा दौरा जालन्यात झाला आहे. याच परिसरात एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य न करणे ही अतिशय खेदाची बाब आहे. या विषयावर राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही, तर याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबईत मोर्चा काढला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule defies the leaders who change the party