सुशांत सिंह आणि क्षितीज प्रसादपर्यंत पोहोचणाऱ्या ड्रग्सचा वितरक एकच

अनिश पाटील
Monday, 28 September 2020

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) अटक केलेल्या क्षितीज प्रसाद याला करमजीत सिंग आणि अंकुश अरनेजामार्फत ड्रग्स मिळत होते.

मुंबई: बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) अटक केलेल्या क्षितीज प्रसाद याला करमजीत सिंग आणि अंकुश अरनेजामार्फत ड्रग्स मिळत होते. सुशांत सिंहपर्यंत पोहोचणारे ड्रग्सही याच करमजीत सिंगकडूनच यायचे.

धर्मा प्रोडक्शनशी संबंधित धर्माटीक एंटरटेन्मेंट कंपनीचा माजी कर्मचारी असलेल्या क्षितीज रवी प्रसादला ड्रग्सप्रकरणी एनसीबीने अटक केली होती. निर्माता करण जोहर याने यापूर्वीच पत्रक जारी करून आपला क्षितीजशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. रविवारी आरोपीला याप्रकरणी सहा दिवसांची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अटक करण्यात आलेला व्यावसायिक आणि ड्रग्स वितरक अंकुश अरनेजाच्या माहितीवरून 25 सप्टेंबरला एनसीबीने क्षितीजच्या अंधेरी चार बंगला परिसरातील घरात छापा टाकला होता. त्यावेळी एनसीबीला गांजा ओढण्यासाठी वापरण्यात येणारा रोल सापडला होता. त्याशिवाय काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू एनसीबीने जप्त केल्या. तो याप्रकरणी अटक आरोपी अंकुश अरनेजाकडून हशीश खरेदी करायचा. याशिवाय याप्रकरणी अटक आरोपी एक वितरक करमजीत सिंग ऊर्फ केजे याच्याकडूनही क्षितीजला ड्रग्स मिळत होते.

करमजीतचा साथीदार संकेत पटेल याच्या मार्फत हे ड्रग्स पोहोचवले जायचे. पटेलच्या जबाबानुसार, त्याने क्षितीजला मे 2020 ते जुलै, 2020 या कालावधीत त्यांच्या इमारतीखाली 12 वेळा वीड(गांजा) दिले होते. प्रत्येकवेळी क्षितीजला 50 ग्रॅम वीड दिले असल्याचे पटेलने एनसीबीला सांगितले. पटेलने करमजीतच्या सांगण्यावरून अंकुश अरेनजालाही ड्रग्स पुरवले होते. हा करमजीत तोच वितरक आहे, ज्याच्याकडून सुशांत सिंग राजपूतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाही ड्रग्स खरेदी करायचा. हेच ड्रग्स सुशांत सिंगपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे याप्रकरणी अटक ड्रग्स वितरक करमजीत मिरांडा, सुशांत सिंग, रिया चक्रवर्ती आणि शौविक यांच्याशी संबंधीत ड्रग्स साखळीशीही संबंधी होता.

अंकुश अरेनजा हा हॉटेल व्यावसायिक असून पवईतील एका बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. याशिवाय करमजीत आनंद उर्फ केजे दोघेही मोठे ड्रग्स वितरक आहेत. यातील अनरेजाकडून एनसीबीने मर्सिडीज कार जप्त केली असून त्याचा वापर ड्रग्स तस्करीसाठी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  केजे याने अंधेरीतील क्लबमध्ये सुशांतला वीड(गांजा) पुरवला होता. तसेच रिया चक्रवर्तीच्या सांताक्रुझ येथील घरी आणि सुशांतच्या वांद्रे येथील घरीही केजेने ड्रग्स पोहोचवले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
 
NCBकडून दिपिका, श्रद्धा, सारा आणि रकुलचे फोन जप्त

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन जप्त केले आहेत. याचा फोनमधील चॅटच्या सहाय्याने एनसीबीने त्यांना चौकशीला बोलावले होते.
 
करण जोहर पार्टी आणि सुशांत सिंह प्रकरणात संबंध नाही

निर्माता करण जोहर यांच्या घरी झालेली पार्टी आणि सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाचा कोणताही संबंध नसल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणी एनसीबी सध्यातरी तपास करत नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

---------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Sushant Singh and Kshitij Prasad only one Same distributor of Cannabis


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh and Kshitij Prasad only one Same distributor of Cannabis