ST च्या 'त्या' 31 कर्मचाऱ्यांचे  निलंबन रद्द होणार; परिवहनमंत्र्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश

प्रशांत कांबळे
Tuesday, 4 August 2020

अलिबाग आगारातील 31 कर्मचाऱ्यांना चार दिवसांपूर्वी तडकाफडकी निलंबित केले होते. या सर्वांचे निलंबन मागे घेण्‍यात यावे; तसेच या संदर्भातील प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश परिवहनमंत्री अनिल परब यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

अलिबाग : अलिबाग आगारातील 31 कर्मचाऱ्यांना चार दिवसांपूर्वी तडकाफडकी निलंबित केले होते. या सर्वांचे निलंबन मागे घेण्‍यात यावे; तसेच या संदर्भातील प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश परिवहनमंत्री अनिल परब यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

खाकी वर्दीवर कोरोनाचा घाला! 24 तासांत राज्यात 'इतक्या' पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

अत्‍यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्‍यासाठी अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांना अलिबाग ते दादर व दादर–पनवेल या मार्गांवर ड्युटी लावली होती. परंतु, या मार्गावर काम करण्‍यास अलिबाग आगारातील  कर्मचाऱ्यांनी नकार दिला होता. त्‍यामुळे आगारातील 15 चालक व 16 वाहकांवर 31 जुलै रोजी निलंबनाची कारवाई करण्‍यात आली. विभाग नियंत्रकांनी केलेल्‍या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्‍ये असंतोषाचे वातावरण होते. सोमवारी अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या कारवाईबद्दल निषेध नोंदवला; तसेच आगार व्‍यवस्‍थापक अजय वनारसे यांची भेट घेऊन हे निलंबन अन्‍यायकारक असून ते मागे घ्‍यावे, अशी मागणी निवेदनातून केली होती. प्रशासकीय पातळीवर कोणत्‍याच हालचाली होत नसल्‍याने कर्मचाऱ्यांमधील असंतोष वाढत होता. 

पुणे-मुंबई रेल्वे सेवा ठप्प; अतिवृष्टीमुळे मंकी हिल रुळावर दरड कोसळली...

अखेर मंगळवारी (ता. 4) कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री अदिती तटकरे व अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्‍यासह मुंबईत परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यांच्याकडे आपली भूमिका मांडत निलंबन मागे घेण्‍याची विनंती केली. या वेळी एस. टी. कामगार सेना अलिबाग युनिटचे अध्‍यक्ष दिलीप पालवणकर व सचिव प्रसन्‍ना पाटील यांनी हे निलंबन कसे अन्‍यायकारक आहे, हे परिवहनमंत्र्यांना पटवून दिले. त्‍यानंतर कामगारांची बाजू समजून घेत परब यांनी निलंबनाची कारवाई मागे घेण्‍याचे आदेश यंत्रणांना दिले. त्‍यानुसार प्रक्रिया सुरू झाली आहे. निलंबन उठवण्‍यात येत असल्‍याचे रायगडच्‍या विभाग नियंत्रक अनघा बारटक्‍के यांनी सांगितले .

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The suspension of 'those' 31 employees of ST will be revoked; Orders of the Minister of Transport to the concerned agencies