T20 World Cup : क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या पाच सट्टेबाजांच्या टोळक्याला पोलिसांकडून अटक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup

T20 World Cup : क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या पाच सट्टेबाजांच्या टोळक्याला पोलिसांकडून अटक..

मुंबई : टी-20 विश्विचषकाच्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यावर सट्टेबाजी केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पाच आरोपी सट्टेबाजांना अटक केली आहे. धर्मेश ऊर्फ धिरेन रोशन शिवदसानी, गौरव रोशन शिवदसानी, धर्मेश रसीकलाल वोरा, फ्रॉन्सिस ऊर्फ विकी ऍन्थोनी डायस आणि इम्रान अर्शरफ खान अशी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सट्टेबाज सट्टेबाजीतून कमावलेले पैसे दुबईतील एका गँगस्टरला पाठवत असल्याचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला संशय आहे.

रविवारी 13 नोव्हेंबर रोजी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर सट्टेबाजी घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अंतिम सामना रविवारी ऑस्ट्रेलिया येथे झाला. याच सामन्यासाठी दादर येथील एका हॉटेलमध्ये काहीजण सट्टा घेत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

पोलीसांनी त्या ठिकाणी छापे ठाकून त्यांच्याकडे रोख रक्कम, मोाबइल संच व इतर साहित्य जप्त केले.आरोपी एकाच वेळी सुमारे 18 अॅप्लिकेशन्स किंवा वेबसाईट्सचा वापर करून क्रिकेट बेटिंग करत होते आणि या आरोपींनी गेल्या वर्षभरापासून अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्रिकेटवर बेटिंग करून प्रचंड पैसा कमावला आहे, अशी माहिती तपासात समोर आलीय.

सट्टेबाजीतून कमाई

अटक आरोपींनी क्रिकेट सट्टेबाजी करून बक्कळ पैसा कमावला असून एवढी मोठी रक्कम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली असल्याचा पोलिसाना संशय आहे आरोपीनं सट्टेबाजीतून कमावलेले पैसे दुबईतील गँगस्टरला पाठविले तर नाही ना या दृष्टीने तपास मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक करत आहे.

पुढील तपासाला सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी सट्टेबाजीसाठी वापरत असलेले सिमकार्ड खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला. या प्रकरणात पोलीस अशा लोकांचा शोध घेत आहेत ज्यांनी बेटिंगसाठी 18 बेटिंग अॅप्लिकेशन तयार केले आहेत. या लोकांनी सट्टेबाजीसाठी अनेकांना आपल्या 18 जणांचे युजरनेम आणि पासवर्ड दिल्याचेही तपासात उघड झाले असून, ते कोण आहेत, याचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखा करत आहे.