
गुन्ह्याच्या गंभीरते नुसार कारवाई करा
मुंबई - मुंबईत दुचाकी चालकांना पोलीस आयुक्तांच्या नव्या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवत असल्यास मुंबई पोलीस गुन्हा नोंद करत होते मात्र आता गुन्हा नोंदवला जाणार नाही. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेत कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे.जर अनवधानाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर गुन्हा नोंदवण्यात येऊ नये परंतु जर जाणून बुजून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या हेतूने गुन्हा नोंद करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते तर लायसन्स देखील रद्द करण्याची तरतूद ठेवली होती. परिणामी वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. अशा प्रकारे गुन्हा नोंद केल्यामुळे तरुणांना सरकारी नोकरी, परदेशी जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यात अडचणी येऊ लागल्या. वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहन चालवायचे यामध्ये सर्वात जास्त दुचाकीस्वार असायचे. पोलीसंकडून आयपीसी प्रमाणे गुन्हा नोंदवल्यामुळे मोठा फटका बसत होता. या निर्णयामुळे दुचाकीस्वाराना दिलासा मिळणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले असले तरी वाहन चालकांनी कायद्याचे पालन केले पाहिजे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.