कोरोना संसर्गाचा कर्करोग्यांवर काय परिणाम होतो; पालिकेच्या मदतीने टाटा मेमोरियलचा अभ्यास

मिलिंद तांबे 
Sunday, 30 August 2020

कर्करोगाने ग्रासलेल्या रूग्णांवर कोरोनाचा नेमका परिणाम काय होतो याचा अभ्यास टाटा मोमोरियल हॉस्पिटलकडून केला जातोय. कर्करोगासह कोरोनाची बाधा झालेल्या 412 रूग्णांवर पालिकेच्या एनएससीआय डोममध्ये उपचार करण्यात आले. त्यातील 19 रूग्णांवर उपचार सुरू असून उतर रूग्णांना टाटा रूग्णालयात हलवण्यात आले.  

मुंबई : कर्करोगाने ग्रासलेल्या रूग्णांवर कोरोनाचा नेमका परिणाम काय होतो याचा अभ्यास टाटा मोमोरियल हॉस्पिटलकडून केला जातोय. कर्करोगासह कोरोनाची बाधा झालेल्या 412 रूग्णांवर पालिकेच्या एनएससीआय डोममध्ये उपचार करण्यात आले. त्यातील 19 रूग्णांवर उपचार सुरू असून उतर रूग्णांना टाटा रूग्णालयात हलवण्यात आले.  

टाटा मेमोरियल हॉस्पिटलने पालिकेच्या मदतीने कर्करोगासह कोविडचा संसर्ग असणाऱ्या 412 रुग्ण आणि त्यांच्या कुटूंबियांवर उपचार केले. हे रुग्ण आणि नातेवाईक राष्ट्रीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऑफ इंडियाच्या (एनएससीआय) जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल होते, अशी माहिती टाटा मेमोरियल कडून देण्यात आली.

कर्करोगासह कोविड असलेल्या 291 रूग्णांचा समावेश आहे. या रूग्णांसह 53 कोरोनाबाधित नातेवाईक व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांवर ही एनएससीआय डोममध्ये उपचार करण्यात आले. त्यातील 19 रुग्ण सध्या एनएससीआयमध्ये डोममध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कर्करोगाने ग्रस्त रूग्णांवर कोविडचा कसा परिणाम होतो, यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अभ्यास सुरू आहे.

टाटा मेमोरियल रुग्णालयात 291 रुग्ण आणि 121 नातेवाईक येथे दाखल झाले. त्यातच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. यात 161 रुग्ण महाराष्ट्रातील, 43 पश्चिम बंगाल, 34 बिहार, 28 उत्तर प्रदेश, 6 मध्य प्रदेश , 4 आसाम, 3 ओडिसा, जम्मू-काश्मीर, झारखंड, त्रिपुरा आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी दोन आणि तामिळनाडू, अंदमान- निकोबार, गोवा आणि बांग्ला देशातील प्रत्येकी एक असल्याची माहिती टाटा मेमोरियल रुग्णालयाकडू देण्यात आली.

टाटा हॉस्पिटलमधील काही रूग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. तेव्हा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वेगळ्या उपाययोजना तयार केल्या. त्यानंतर पालिकेशी बोलून टाटा मधील सर्व रुग्णांना एनएससीआय डोममध्ये पाठवण्यात आले. येथील सर्व कर्करोगाने ग्रासलेल्या कोविड रूग्णांवर कसा परिणाम झाला ते समजून घेण्यासाठी रुग्णालय अभ्यास करत असल्याची माहीती टाटा मेमोरियल सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी दिली.

आधीच कर्करोगाने ग्रस्त असलेले रुग्ण हाय रिक्स कॅटेगरीतले असतात. त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे कोविडची बाधा झाल्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्याने खालावते, त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना कोविडची बाधा झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची जास्त काळजी घ्यावी लागते. टाटा मेमोरियलमध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून प्रत्येक रुग्णांची तपासणी करत होतो. असे टाटा रुग्णालयातून एनएससीआयचे समन्वयक डॉ.याज्ञिक वाजा यांनी सांगितले. रुग्णांची नियमितपणे देखरेख केली जात असून त्यांच्या प्रकृतीत काही गुंतागुंत आढळल्यास त्यांना तातडीने टाटा मेमोरियलमध्ये हलवले जाते, असेही डॉ.वाजा यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Tata Memorial Hospital is studying the effects of corona on cancer patients