Mumbai : पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना ठाण्यात करमाफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thane
पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना ठाण्यात करमाफी

पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना ठाण्यात करमाफी

ठाणे : मागील निवडणुकीवेळी शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफीची घोषणा केली होती; मात्र आता साडेचार वर्षांनंतर आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी शिवसेनेने शहरातील पाचशे चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय गुरुवारी सर्वसाधारण सभेत घेत त्यासंबंधित ठराव केला. हा ठराव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येईल; मात्र या निर्णयामुळे ठाणे पालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.

२०१७ मध्ये ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी शिवसेनेने ठाणे पालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटांच्या मालमत्तांना करमाफीची घोषणा वचननाम्यात केली होती; मात्र काही हालचाली होत नसल्याने भाजपकडून शिवसेनेवर टीका होत होती. यानंतर आता पालिका क्षेत्राच्या शहरातील ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे, विकास रेपाळे यांनी गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत मांडला. या योजनेची अंमलबजावणी करण्याची सूचना नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली. या ठरावाला लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास या वेळी महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. कोरोना काळात निश्चितच ठाणेकरांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.

निवडणुकीचा जुमला

हा ठराव मंजूर झाल्यास पालिकेच्या तिजोरीवर १५० ते १७५ कोटींच्या वर बोजा पडणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. तसेच सत्ताधारी शिवसेनेच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींनीदेखील करमाफी शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे हा निवडणुकीचा जुमला तर ठरणार नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

loading image
go to top