Teachers Union Protest : शिक्षक संघटनांचे आंदोलन सुरूच; बारावीच्या परीक्षा मात्र सुरळीत
मुंबई - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे मागील पाच दिवसांपासून बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आंदोलन सुरूच आहे. सरकारकडून आपल्या मागण्यांबाबत जी बैठक घेण्यात आली, त्या बैठकीचे इतिवृत्त अद्यापही दिले जात नसल्याने आंदोलन सुरूच ठेवले असल्याचे महांघाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ओसी विषयाच्या सर्व मुख्य नियामकांनी सभा न घेता त्यांनीही बहिष्कार आंदोलनात सहभाग घेतला असल्याचे पत्र मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिले.
राज्यात बारावीच्या लेखी परीक्षा सुरू असून त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्याने परीक्षेच्या पहिल्या दिवसांपासून पेपरमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी समोर आल्या आहेत.
त्यामुळे या परीक्षा कालावधीत एकाही विषयाच्या मुख्य नियामकाची सभा झाली नाही. इंग्रजी, मराठी, हिंदी इत्या़दी भाषा विषयानंतर आज ओसी (वाणिज्य संघटन व व्यवस्थापन) विषयाची परीक्षा होती.
या विषयाच्या मुख्य नियामकाची सभासुद्धा बहिष्कारामुळे आज होऊ शकली नाही. त्यामुळे हे आंदोलन असेच सुरू राहिल्यास अनेक विषयाच्या पेपरमध्ये त्रुटी समोर येतील आणि त्यामुळे त्याचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
हे सर्व वेळीच रोखण्यासाठी सरकारने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सुरू केलेले आंदोलन तातडीने मागे घेतले जाईल, यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालक संघटनांकडून केली जात आहे.
घोळाबाबत निर्णय नाही
इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नांऐवजी उत्तरे छापल्यामुळे झालेला सहा गुणांचा घोळ, हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एकसमान अनुक्रम छापल्यामुळे झालेला दोन गुणांचा घोळ, याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.
उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून
राज्य मंडळाकडून उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळा-महाविद्यालयांत यायला सुरुवात झाली असून त्याची तपासणी होणार नसल्यामुळे ते तसेच पडून आहेत. राज्यात साडेचौदा लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत.
शिक्षकांचा परीक्षेवर बहिष्कार नसल्यामुळे परीक्षा सर्वत्र सुरळीत पार पडत आहेत; परंतु बहिष्कार लांबला, तर निकाल वेळेवर लागणार नाही. त्यासाठी सर्व जबाबदारी ही शिक्षण मंडळ आणि शालेय शिक्षण विभागाची राहील, असे शिक्षक महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी स्पष्ट केले.