सांगा चालायचं कसं?

सांगा चालायचं कसं?

पनवेल : शहरांचे शिल्पकार म्हणून ओळखली जाणारी सिडको; तसेच पालिकेकडून शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल, प्रशस्त रस्ते, पदपथ, गटारे अशी अनेक आश्वासने पनवेलकरांना दिली जात आहेत. या योजना साकारण्यासाठी शेकडो कोटी रुपये पाण्यासारखे खर्चही होत आहेत; मात्र वाहतुकीतील पादचारी या महत्त्वाच्या घटकाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे शहरातील पादचाऱ्यांना ‘सांगा चालायचं कसं’ असा प्रश्न पडत आहे. 

पनवेल, मुंबईसारख्या शहरात वाहन चालवणे सोपे; मात्र चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे पदपथाचा वापर करणाऱ्या पादचाऱ्यांकडे लक्ष देण्याबाबत सिडको, पालिका; तसेच वाहतूक पोलिस यंत्रणांमध्ये उदासीनता असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिका हद्दीतील सिडको वसाहती; तसेच इतर शहरी भागात अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी वापर करता आणलेले जनरेटर पदपथावर अथवा मोकळ्या जागेत ठेवले आहेत; तर फेरीवाल्यांनीही अतिक्रमण केले असल्याने नागरिकांना पदपथावरून चालणे अवघड झाले आहे. त्यामुळे मार्गात अडथळा ठरणाऱ्या जनरेटरविरोधात पालिका प्रशासन अथवा सिडको विभाग कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरातील अनेक भागातील हॉटेल आणि रेस्टॉरंटचालक, बॅंका; तसेच मोठमोठ्या व्यावसाईक आस्थापनांकडून वीज खंडित झाल्यावर व्यवसायावर परिणाम होऊ नये, याकरिता जनरेटरची खरेदी करण्यात आली आहे. जनरेटरची खरेदी केल्यानंतर तो ठेवण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या जागेचा वापर करणे गरजेचे आहे; मात्र या बाबींकडे जनरेटर वापरणारे व्यावसायिक सोईस्कररित्या दुर्लक्ष करत असून, पदपथ, इमारतींची मार्जिनल स्पेस अथवा इमारतीसमोरील मोकळ्या जागेचा वापर कोणत्याही परवानगीशिवाय करत असल्याचे कळंबोली, खारघर, कामोठे; तसेच पालिका हद्दीतील जवळपास सर्वच वसाहतींमध्ये पाहायला मिळत आहे. 

वीज खंडित झाल्याने अडचण निर्माण होऊ नये, याकरिता वापर होत असलेले जनरेटर बॅंका; तसेच रुग्णालय प्रशासनाच्या आवारात ठेवण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नसली, तरी शहरात इतर व्यवसाय करणाऱ्यांवर मात्र चाप बसवणे आवश्‍यक असल्याचे मत संगीता पाटील यांनी व्यक्त केले. 

या रस्त्यांवर चालणे कठीण
नवीन पनवेल - नवीन पनवेल रेल्वेस्थानक परिसरात पदपथावर दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने पदपथावरून चालणे अवघड झाले आहे. 
कळंबोली - कळंबोली परिसरात सिडकोमार्फत मागील काही दिवसांपासून नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम करताना नाल्यातील गाळ पदपथावर टाकण्यात आला आहे. 
खांदेश्वर - खांदेश्वर परिसरातील भूखंड आरक्षित करण्यात आल्याने भूखंडावर अनेक वर्षे व्यवसाय करणारे मच्छी व्यावसायिक पदपथावर व्यवसाय 
करत आहेत. 
पनवेल - पनवेलमधील अनेक भागांत भाजी व्यावसायिक पदपथावर व्यवसाय करत असल्याने पादचाऱ्यांना अडचण 
होत आहे.

शहरामध्ये वाहनतळ उपलब्ध करून द्यावेत, याकरिता सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जेणेकरून वाहनचालक गैरसोईच्या ठिकाणी वाहने उभी करणार नाहीत. 
- अभिजित मोहिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, पनवेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com