किरीट सोमय्या आले ‘जमिनीवर’; भाजपच्या कार्यक्रमातील फोटो व्हायरल

टीम ई-सकाळ
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

भाजपच्या कार्यालयात एका पाठोपाठ एक पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पळताभुई थोडी करणाऱ्या किरीट सोमय्यांवर भाजपच्या कार्यक्रमात जमिनीवर बसण्याची वेळ आली. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

ठाणे : किरीट सोमय्या. एकेकाळी भाजपमधील मोठं नाव होतं. पण, गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकिट कापण्यात आलं. भाजपच्या कार्यालयात एका पाठोपाठ एक पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पळताभुई थोडी करणाऱ्या किरीट सोमय्यांवर भाजपच्या कार्यक्रमात जमिनीवर बसण्याची वेळ आली. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा : गयाराम नेत्यांवर शरद पवार पहिल्यांदा बोलले; काय म्हणाले पवार? 

‘शो मस्ट गो ऑन’
‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात मानापमान नाट्य पाहावयास मिळाले. केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्याबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या जाहीर भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी खासदार भाजपचे ठाणे जिल्हा प्रभारी किरीट सोमय्या यांनीही व्यासपीठाऐवजी थेट सभागृहातील व्हरांड्यातच बसल्याने, तो चर्चेचा विषय ठरला. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक विनवण्या करूनही सोमय्या व्यासपीठावर येत नसल्याचे पाहून चक्क ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत कार्यक्रम पुढे रेटला. त्यामुळे भाजपमध्ये आयाराम आणि प्रस्थापित अशा गटबाजीची नांदी झाल्याचे दिसून आले.

आणखी वाचा : उदयनराजेंच्या साताऱ्यातील भाषणातले ‘हे’ दहा मुद्दे महत्त्वाचे

चर्चा तर होणारच
दरम्यान, यासंदर्भात भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. सोमय्या यांनी देखील सभागृहात मोकळ्या व्हरांड्यात बसकण मारल्याने या मानापमान नाट्याची चांगलीच चर्चा सभागृहात रंगली होती. आता, सोमय्यांना खरचं अपमान झाला की, ती नाराज असल्यामुळे व्हरांड्यात बसले, याविषयी माहिती मिळालेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात घडलेले हे मानापमान नाट्य चर्चेचा विषय ठरणार आहे.

आणखी वाचा : महत्त्वाच्या जागा देण्यास भाजप तयार

सोमय्याचं असं का झालं?
किरीट सोमय्या यांनी शिवसेना-भाजप युती फुटल्यानंतर शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्यासह इतरांवर केलेल्या जहाल टीकेमुळे शिवसेनेत सोमय्या यांच्याविषयी नाराजी होती. लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर सोमय्यांच्या तिकिटाला शिवसेनेतून विरोध झाला. हा विरोध इतका टोकाला गेला की, भाजपला नाईलाजाने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलावा लागला. भाजपने मनोज कोटक यांना संधी दिली. कोटक यांचा अर्थातच विजय झाला. पण, सोमय्या भाजपच्या वरच्या फळीतून बाजूला फेकले गेले.

आणखी वाचा : बेरोजगारीवर आठवलेंनी केले भाष्य, म्हणाले...

मुस्लिम महिलांचा काढता पाय
जम्मू-काश्‍मीरमधून कलम ३७० रद्द केल्याच्या जनजागृतीसाठी भाजपच्या जनजागृती अभियानासाठी कळवा-मुंब्रा येथून बहुतांश मुस्लिम महिला व कार्यकर्त्यांना बसेस भरून आणण्यात आले होते.मात्र, जे. पी. नड्डा यांचे भाषण सुरू होताच बाल्कनीत बसलेल्या मुस्लिम महिलांनी काढता पाय घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane bjp program former mp kirit somaiya sits on the floor viral photo