मुख्यमंत्री साताऱ्याचे म्हणून साताऱ्याचेच पालकमंत्री; राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane District Guardian Minister Shambhuraje Desai

मुख्यमंत्री साताऱ्याचे म्हणून साताऱ्याचेच पालकमंत्री; राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे

डोंबिवली - ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद सातारा येथील शंभूराजे देसाई यांना देण्यात आले आहे. यावर भाजपा आणि मनसेने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही यावर टिका केली आहे. ठाणे जिल्ह्यातील स्थानिक आमदारांना पालकमंत्री पद मिळाले असते तर अधिक आनंद झाला असता. मात्र मुख्यमंत्री शिंदे हे मुळचे साताऱ्याचे असून पालकमंत्री देसाई हे देखील साताऱ्याचे आहेत.

आपल्या गावचाच एक सहकारी म्हणून त्यांनी देसाई यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे सुत्र सोपवले असावे. ठाणे जिल्ह्यातील कोणा आमदाराला पालकमंत्री पद दिले असते तर कल्याण डोंबिवलीच्या पंचक्रोशीचा देखील चांगला विकास झाला असता असा टोला राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पालकमंत्री पद निवडीवरुन लगावला आहे.

डोंबिवलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मत व्यक्त केली. कल्याण डोंबिवली शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. याआधी नागपूर गुन्हेगारीत राज्यात अग्रेसर होते. आता कल्याण डोंबिवलीने नागपूरला मागे टाकले आहे. सांकृतिक शहर म्हणून देशात नावाजलेल्या या शहराला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे.

येथील पोलीस यंत्रणा नक्की काय करतेय ? हे शहर भयमुक्त होण्यासाठी डोंबिवलीत मंगळवारी 4 ऑक्टोबर सकाळी इंदिरा चौकात राष्ट्रवादी धरणे आंदोलन करणात आहे. या आंदोलनात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विद्या चव्हाण यांसह बहुसंख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे तपासे यांनी सांगितले. यानंतरही पोलीस यंत्रणेने आपले काम व्यवथित केले नाही तर राष्ट्रवादीकडून जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर पालकमंत्री निवडीवरून टीका केली. स्थानिक माणसाला स्थानिक प्रश्न ,लोकांची ओळख असते यामध्ये काही दुमत नाही. परंतू मुख्यमंत्री साताऱ्याचे म्हणून पालकमंत्री देखील साताऱ्याचेच निवडले गेले आहेत असे ते म्हणाले. ठाण्यातील ओवळा माजीवडा मतदारसंघावरुन शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यातील नाराजी आता उघड झाली आहे. भाजपा हा शिंदे गटाचा राजकीय उपयोग करुन घेत आहे हे आता राज्यातील सर्वच नागरिकांना माहित झाले असेल. ज्यांनी बंड केले त्या 40 आमदारांना माहित आहे की, पुढच्या वेळेस त्यांना काही ना काही त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

केवळ ओवळा माजीवडा नाही तर कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा मतदार संघावर डोळा आहे. त्याच्यामुळे आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. इडीच्या तपासाचा क्लोजर रिपोर्ट प्रताप सरनाईक यांच्या संदर्भातील दाखल झाला होता, तो परत उघडकीस आणला जातो की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्याचबरोबर कल्याण पश्चिम मध्ये नरेंद्र पवार भाजपचे माजी आमदार यांना पूर्णपणे भाजपने पाठबळ दिलेल आहे असेही ते म्हणाले.