ठाणे जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासणार नाही : सुभाष देसाई

गिरीश त्रिवेदी
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

बदलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलेल्या बारवी धरणाचे जलपूजन गुरुवारी उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे हे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले, ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे देसाई म्हणाले. 

पाण्याची पातळी वाढल्याने कोळे वडखळ गावात पाणी शिरले आहे. त्या गावातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे सरकारचे धोरण असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. आमदार किसन कथोरे, एमआयडीसीचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांनी पुनर्वसनासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे देसाई यांनी आभार मानले. यावेळी बारवी धरण उंची वाढवण्याचा प्रकल्प यशस्वी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सुभाष देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्यकार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकनेर, प्रादेशिक अधिकारी चिकुर्ते, मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण, संतोष कळसकर, अरुण कटाळे, भाजप तालुकाध्यक्ष राजेश पाटील, तहसीलदार जयराज देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वायले आदी मान्यवर उपस्थित होते. 

दोन वर्षातील मेहनत यशस्वी 
धरणाची उंची वाढवण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. दोन वर्षांपूर्वी आपण स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली. प्रत्यक्ष गावात जाऊन पहाणी केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यावर तोडगा काढून निर्णय घेतल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षातील मेहनत आज यशस्वी झाली आहे. बारवी धारण पूर्ण क्षमतेने भरून वाहताना पाहून खरोखरच आनंद होत आहे. आता जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane district will not have water scarcity: Subhash Desai