ठाण्याला मिळणार आणखी दोन नगररचनाकार; क्लस्टर योजनेला बुस्टर देण्यासाठी तयारी

राजेश मोरे
Tuesday, 17 November 2020

महापालिकेला आता आणखी दोन नगररचनाकार, चार सहाय्यक नगररचनाकार आणि एक उपायुक्त मिळणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रिक्त पदांसाठी तयार करण्यात आलेल्या आकृतीबंधानुसार आता पालिकात नव्याने भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार महापालिकेला आता आणखी दोन नगररचनाकार, चार सहाय्यक नगररचनाकार आणि एक उपायुक्त मिळणार आहे. त्यामुळे ठाण्याचा विकास आराखडा सुलभ व योग्य पध्दतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ठाण्यात क्‍लस्टर योजना देखील आकार घेत असून त्याला बुस्टर देण्यासाठी नव्याने दाखल होणाऱ्या नगररचनाकारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

हेही वाचा - ठाणे शहरातील कोरोना आटोक्‍यात! संख्या दोन आकड्यात, रिकव्हरी रेट 95 टक्‍क्‍यांवर 

त्यानुसार कमलेश मडावी, मनिषा केदारे, प्रदिप गोहिल आणि व्ही. गौतम यांची सहाय्यक नगररचनाकार म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तर दिपाली बसाखेत्रे आणि पुरषोत्तम शिंदे यांची नगररचनाकार पदावर नियुक्ती केली जाणार आहे. तसेच डॉ. किशोर गवस यांची उपायुक्त पदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. 

आधीच्या विकास आराखडयाची 100 टक्के अंमलबजावणी अद्यापही ठाण्यात झालेली नाही. त्यामुळे त्याची योग्य सांगड घालत महापालिकेचा नव्याने विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच पालिका हद्दीत क्‍लस्टर योजना देखील आकार घेत आहे. शहरातील हाजुरी, किसन नगर, लोकमान्य नगर, राबोडी, कोपरी आदी भागात क्‍लस्टरच्या अनुषंगाने सर्वेक्षण देखील झाले आहे. तर काही ठिकाणचे सर्वेक्षण शिल्लक आहे. तसेच क्‍लस्टरसाठी वेगळा विभागही तयार करण्यात आला आहे. परंतु, त्याठिकाणी अद्याप अधिकारी देण्यात आलेले नाहीत. पालिकेतील कार्यरत अधिकाऱ्यांच्याच खांद्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु आता या नव्या नियुक्तीमुळे विकास आराखडयास आणखी चालना मिळणार आहेच, शिवाय क्‍लस्टरला बुस्टर देखील मिळेल. 

हेही वाचा - सिंगल विडो सिस्टमचा एमआयडीसीला आधार! कोरोनाकाळात उद्योजकांची गैरसोय दूर

प्रस्ताव महासभेच्या पटलावर - 
महापालिकेतील महत्वाची पदे भरली जावीत यासाठी पालिकेच्या माध्यमातून आकृतीबंध तयार करण्यात आला होता. त्याअनुषंगाने शासनाने काही महत्वाचे पदे भरण्यासाठी परवानगी दिलेली आहे. याचाच भाग म्हणून पालिकेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव 20 नोव्हेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार नियुक्तीचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. 

Thane to get two more town planners Preparing to give a booster to the cluster plan 
----------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane to get two more town planners Preparing to give a booster to the cluster plan

Tags
टॉपिकस