Thane News : ठाणे पालिकेचा अजब कारभार! रस्त्यांचा नाही पत्ता; आणि कामाच्या काढल्या निविदा

ठाणेकरांना खड्डे मुक्त व वाहतूक कोंडी मुक्त प्रवास करता यावा, यासाठी ठाणे पालिकेच्या माध्यमातून शहरातील २८४ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली.
Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation sakal

ठाणे - ठाणेकरांना खड्डे मुक्त व वाहतूक कोंडी मुक्त प्रवास करता यावा, यासाठी ठाणे पालिकेच्या माध्यमातून शहरातील २८४ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाकडून कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दुसरीकडे २८४ पैकी ३४ रस्ते हे पालिकेच्या अखत्यारीत नसताना देखील त्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया राबवीत कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. तर, त्यातील १० रस्ते पालिकेला ताब्यात घेणे देखील शक्य नाही. असे असताना, त्या रस्त्यांवर पैशांची उधळण का करण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर, ठाणे पालिकेच्या माध्यामतून मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत ठाणे शहरातील रस्त्यांची कामे असो, शहरात करण्यात येणारी रंगरंगोटी असो आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात ठाणेकरांना खड्डे मुक्त व वाहतूक कोंडी मुक्त प्रवासाची हमी पालिकेकडून देण्यात आली आहे.

त्यानुसार शहरातील २८४ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. आता कुठे रस्त्यांची कामे प्रत्यक्षात दृष्टीपथात येत असून महापालिकेने हाती घेतलेल्या हे रस्ते डांबरी, सिमेंट कॉंक्रीट, मास्टीक अशा पध्दतीने केली जात आहेत. या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबरअखेर सुरू करण्यात आले.

तर दुसऱ्या टप्प्याचे काम फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरू करण्यात आले. विशेषत: महापालिका प्रशासनाला पहिल्या टप्प्यातील १२७ रस्त्यांसाठी २१४ कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातील १५७ रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून ३९१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

त्यातही या दोनही टप्यातील कामांसाठी वांरवार तारखा बदलण्यात आल्या. आता पुन्हा आणखी १५ दिवसांची मुदत पालिकेने घेतली आहे. ऑक्टोबर पासून हा तारीख पे तारीखचा खेळ सुरु आहे. पाच मुदतवाढ देऊनही सरासरी ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

दरम्यान, ठाणे पालिका क्षेत्रातील २८४ रस्त्यांपैकी आतापर्यंत २५० रस्त्यांची कामे अंतिम टप्यात आहेत. उर्वरित ३४ रस्त्यांपैकी २४ रस्त्यांच्या बांधकामात जागेअभावी अडचणी येत आहेत. तर, उर्वरित १० रस्ते अद्यापही महापालिका प्रशासनाला ताब्यात घेता आलेले नाहीत. तर ते ताब्यातही घेता येणे शक्य नसल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.

असे असताना, या रस्त्यांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया व ठेकेदाराची नेमणूक का असा प्रश्न ठाणेकरांकडून विचारला जावू लागला आहे. त्यामुळे रस्त्याचा नाही पत्ता मात्र, कामाच्या काढल्या निविदा अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे.

या ठिकाणी रस्त्यांची अडचणी

कळवा-०४, मुंब्रा-०२, दिवा-०४, घोडबंदर-०३, वर्तक नगर-०२, वागळे-०२ आणि इतर ठिकाणे या तीन रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांचा ताबा घेण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com