मुंबईनंतर आता ठाण्यात  'रेमडेसिविर' चा काळाबाजार करणारी टोळी अटकेत

पूजा विचारे
Thursday, 23 July 2020

रेमडेसिविर आणि टोसिलिझुमॅब औषधांचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने अटक करण्यात आली आहे.

मुंबईः कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा आणि इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधींचा आणि इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुंबईनंतर आता ठाण्यात हा काळाबाजार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. रेमडेसिविर आणि टोसिलिझुमॅब औषधांचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. ही टोळी 3 हजारांचे इंजेक्शन 25 हजार रुपयांना तर अन्य एक इंजेक्शन तब्बल 80 हजार रुपये किंमतीत विकत होती. 

अरुण सिंग (३५), सुधाकर गिरी (३७), रवींद्र शिंदे (३५), वसीम शेख (३२) आणि अमिताभ दास (३९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून हे सर्वजण मुंबई आणि नवी मुंबई भागातील रहिवासी आहेत.

तक्रारदारानुसार,  21 जुलै 2020 ला रात्री 9 वाजताच्या सुमारास ठाणे खंडणी विरोधी पथकाला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची खातरजमा करत संभावित तीन पेट्रोल पंप, नौपाडा भागात सापळा रचला. पोलिस पथकानं इंजेक्शनसह तिघांना अटक केली. अधिक चौकशीदरम्यान औषधे पुरविणारे दोन आरोपी हे नवी मुंबई कामोठे येथे असल्याचं समजताच त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपींकडून Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शनसह कँसर, गर्भपात आदींची औषधं आणि हुंडाई एसेंट कार असा 5 लाख 18 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान आतापर्यंत मीरा रोड, मुलुंड आणि ठाण्यात अशा प्रकारे 3 कारवाई अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे काळा बाजार करुन इंजेक्शन विकणाऱ्या विरोधात नागरिकांनी देखील समोर यावे, असे आव्हान अन्न आणि औषध प्रशासन विभागानं केलं आहे.

मुंबईतही कारवाई 

याच आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईतही असा काळाबाजार करणाऱ्या सेल्समनला अन्न व औषध पुरवठा विभागानं छापा टाकून अटक केली. यात सात जणांच्या टोळीला अटक केल्याचं समोर आलं आहे. हे सेल्समन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात. हे विक्रेते कोरोनावर असलेले उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन 30 ते 40 हजार रुपयात विकत होते.

अशा पद्धतीनं केली कारवाई

18 जुलै या दिवशी मुलुंड पश्चिम येथील बाल राजेश्वर मंदिर, एलबीएस रोड येथे बनावट ग्राहक पाठवून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला. त्यावेळी विकास दुबे आणि राहुल गाडा हे एक रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन विक्री करण्यासाठी आले असता त्यांना या औषधाची विक्री करताना रंगेहाथ पकडले.

पुढील तपासात कॉविफॉर (रेमडिसिविर इंजेक्शन) या औषधाच्या 06 व्हायलचा साठा राहुल गाडा यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत या औषधाच्या काळाबाजार करून विक्रीच्या साखळी मध्ये भावेश शहा, अशिष कनोजिया, रितेश ठोंबरे, गुरविंदर सिंग आणि सुधीर पुजारी (डेलफा फार्मासिटिकल, घाटकोपर, मुंबई) हे सामील असल्याचे आढळले. 

या सर्व व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोन ठिकाणाहून 12 आणि सापळ्या दरम्यान 1 अशा एकूण 13 रेमडिसिविर इंजेक्शनचा अवैधपणे बाळगलेला साठा जप्त करण्यात आला.

Thane police arrested five persons black marketing Covid 19 Remdesivir and Tocilizumab injections


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane police arrested five persons black marketing Covid 19 Remdesivir and Tocilizumab injections